252 कोटी ड्रग्स प्रकरणात श्रद्धा कपूरच्या भावाला समन्स, ऑरीदेखील अडचणीत, नेमकं प्रकरण काय?
Tv9 Marathi November 22, 2025 01:45 AM

मुंबईतील २५२ कोटी रुपयांच्या ड्रग्स प्रकरणी अमली पदार्थ विरोधी पथकाकडून तपास केला जात आहे. आता अमली पदार्थ विरोधी पथकाने बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूरला समन्स बजावले आहे. तसेच, सोशल मीडियावरील लोकप्रिय चेहरा ओरहान अवत्रामणी उर्फ ऑरी यालाही दुसरे समन्स बजावले आहे. येत्या मंगळवारी २५ नोव्हेंबरला सिद्धांत कपूरला त्याचा जबाब नोंदवण्यासाठी बोलवण्यात आले आहेत. तर २६ नोव्हेंबरला ऑरीला हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी कक्षाने घाटकोपर युनिटने या दोघांना चौकशीसाठी बोलावले आहे.

नेमकं प्रकरण काय?

मुंबई पोलिसांनी उघडकीस आणलेले २५२ कोटी रुपयांचे ड्रग्स प्रकरण मेफेड्रोन (MD) या अमली पदार्थाच्या तस्करांशी संबंधित आहे. ऑगस्ट २०२२ पासून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. याप्रकरणी आतापर्यंत २१.८२ किलो ड्रग्स जप्त करण्यात आले आहेत. या रॅकेटचे उत्पादन केंद्र सांगलीतील एका फॅक्टरीमध्ये होते. याचे कनेक्शन अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या टोळीशी असल्याचे बोललं जात आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी मोहम्मद सलीम मोहम्मद सुहैल शेख याला दुबईतून अटक करण्यात आली आहे. त्याच्या चौकशीतून या प्रकरणाला हाय-प्रोफाईल वळण मिळाले आहे.

आरोपी सलीम शेखने दिलेल्या जबाबातून अनेक बॉलिवूड आणि राजकीय व्यक्तींची नावे उघड केली आहेत. यात त्याने श्रद्धा कपूर, सिद्धांत कपूर, नोरा फतेही आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ऑरी यांच्यासह अनेकांसोबत देश-विदेशात ड्रग्ज पार्ट्याचे आयोजन केल्याचा दावा केला आहे. या दाव्यांची सत्यता तपासण्यासाठी मुंबई पोलिसांकडून विविध सेलिब्रेटींना चौकशीसाठी बोलवले जात आहे.

याच पार्श्वभूमीवर आता अमली पदार्थ विरोधी कक्षाने श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूर आणि ऑरी यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. या दोघांच्या चौकशीनंतर इतर सेलिब्रिटींना समन्स बजावण्यात येणार आहे.

नोरा फतेहीचे स्पष्टीकरण

दरम्यान या प्रकरणी नाव आल्यानंतर अभिनेत्री नोरा फतेहीने सोशल मीडियावर आपली बाजू स्पष्ट केली आहे. तिने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे स्पष्टीकरण दिले आहे. मी या अशा पार्ट्यांना कधीही जात नाही. तसेच माझा या अशा व्यक्तींशी काहीही संबंध नाही. मी कामात व्यस्त असते. माझे नाव विनाकारण या प्रकरणाशी जोडले जात आहे. मला टार्गेट केले जात असून माझे नाव या अशा प्रकरणांपासून दूर ठेवावे, अन्यथा याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, असे तिने म्हटले होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.