एसीसी मेन्स आशिया कप रायझिंग स्टार्स 2025 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इंडिया ए आणि बांग्लादेश ए संघात पार पडला. या सामन्यात सर्व काही भारतीय संघाच्या बाजूने होतं. पण विजय काही मिळवता आला नाही. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमवून 194 धावा केल्या आणि विजयासाठी 195 धावांचं आव्हान ठेवलं. हे आव्हान गाठताना भारताला शेवटच्या चेंडूवर 4 धावांची गरज होती. पण भारताने तीन धावा काढल्या आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. भारताच्या आयपीएल सुपर स्टार्सकडून सुपर ओव्हरमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. पण बांगलादेशी गोलंदाजांनी सुपर ओव्हरमध्ये भारताची हवा काढली. पहिल्या दोन चेंडूवर दोन विकेट काढल्या आणि भारताचा खेळ संपवला. त्यामुळे विजयासाठी फक्त 1 धाव मिळाली. त्यात पण वाइड टाकला आणि पराभवाचं तोंड पाहावं लागलं.
उपांत्य फेरीत बांगलादेशच्या हबीबूर रहमान सोहनची 65 आणि एसएम मेहेरोबच्या नाबाद 48 धावांची खेळी महागात पडली. या दोघांनी भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. विजयकुमार विसकने सर्वात महागडा स्पेल टाकला. त्याने 4 षटकात एकही गडी बाद न करता 51 धावा दिल्या. तर गुरजपनीत सिंगने 2 विकेट घेतल्या पण 39 धावा दिल्या. रमणदीप सिंगने 2 षटकात 1 विकेट घेत 29, नमन धीरने 2 षटकात 33 धावा देत 1 विकेट घेतला. हर्ष दुबेने चांगला स्पेल टाकला. 4 षटकात 1 गडी बाद करत 22 धावा दिल्या. विजयी धावांचा पाठलाग करताना वैभव सूर्यवंशीने 15 चेंडूत 4 षटकार आणि 2 चौकार मारत 38 धावा केल्या. तर प्रियांश आर्यने 44, जितेश शर्माने 33, नेहल वढेराने 32 धावा केल्या.
पराभवानंतर कर्णधार जितेश शर्माने आपल्या भावना व्यक्त केल्या. जितेश शर्मा म्हणाला की, ‘मी सर्व जबाबदारी घेईन, एक वरिष्ठ खेळाडू म्हणून मला खेळ संपवायचा आहे. हा शिकण्याबद्दल आहे, पराभवाबद्दल नाही. तुम्हाला कधीच माहिती नाही, हे खेळाडू कधीतरी भारतासाठी विश्वचषक जिंकू शकतात. प्रतिभेच्या बाबतीत ते आकाशाला स्पर्श करत आहेत. हे सर्व शिकण्याबद्दल आणि अनुभवाबद्दल आहे. माझी विकेट हा टर्निंग पॉइंट होता. मला या परिस्थिती कशा हाताळायच्या हे माहित आहे. त्यांनी खरोखर चांगली गोलंदाजी केली. त्याने 19वे षटक टाकले, त्याचे श्रेय त्याला जाते. सर्व 20 षटक आम्ही नियंत्रणात होतो, कोणालाही दोष देऊ नका. हा एक चांगला खेळ आहे. ‘