अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या पुलावर एक भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात आलेल्या एका चारचाकी वाहनाने समोरून येणाऱ्या अनेक दुचाकींना जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अनेक जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे या अपघाताचे सीसीटीव्ही (CCTV) फुटेज देखील समोर आले आहे. ज्यामध्ये घटनेचा थरार कैद झाला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही चारचाकी कार पुलावरून अत्यंत भरधाव वेगात जात होती. यावेळी चालकाचे वाहनावरील नियंत्रण पूर्णपणे सुटले. नियंत्रण सुटलेल्या या कारने पुलाच्या दुसऱ्या बाजून जात असलेल्या अनेक दुचाकींना अक्षरशः चिरडले. ही धडक इतकी जबरदस्त होती की दुचाकीवरील लोक दूरवर फेकले गेले, तसेच त्यांच्या दुचाकींचे मोठे नुकसान झाले. या अपघाताच्या तीव्रतेवरून कार प्रचंड वेगात होती, असे बोललं जात आहे.
दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यूया भीषण दुर्घटनेत दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मृत व्यक्तींची नावे आणि ओळख अद्याप समोर आलेली नाही, पोलीस त्यांची ओळख पटवण्याचे काम करत आहेत. मात्र या घटनेने मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
या अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम पुलावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या फुटेजमध्ये भरधाव कार कशी अनियंत्रित झाली आणि तिने दुचाकींना धडक दिली, हे स्पष्टपणे दिसत आहे. पोलिसांनी हे फुटेज जप्त केले असून, या फुटेजच्या आधारे अपघाताच्या नेमक्या कारणांचा आणि कार चालकाचा शोध घेत आहेत.
चालक मद्यधुंद अवस्थेत होता का?अपघातानंतर पुलावर एकच गोंधळ उडाला होता. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि ये-जा करणाऱ्या लोकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले आणि जखमींना रुग्णालयात दाखल करण्यास मदत केली. अंबरनाथ पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून सध्या कार चालकाचा शोध घेतला जात आहे. अपघातग्रस्त कार कोणाच्या नावावर आहे? चालक मद्यधुंद अवस्थेत होता का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पोलीस कसून तपास करत आहेत. लवकरच या कार चालकाला अटक केली जाईल, असे पोलिसांकडून सांगितले जात आहे.