राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. येत्या 2 डिसेंबर रोजी नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला असतानाच आता मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटाचे नेते निलेश राणे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक आमने-सामने आल्याचं पहायला मिळत आहे. वैभव नाईक यांनी आता थेट निवडणूक आयोगाला पत्र लिहून मोठी मागणी केली आहे. त्यामुळे ऐन हिवाळ्यात सिंधुदुर्गचं राजकीय वातावरण तापलं आहे. निलेश राणे यांच्या पोलीस संरक्षणात कपात करावी अशी मागणी वैभव नाईक यांच्याकडून करण्यात आली आहे. तसेच त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे देखील तक्रार केली आहे.
वैभव नाईक यांचं निवडणूक आयोगाला पत्र
वैभव नाईक यांनी आता थेट राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहलं आहे, ज्यामध्ये त्यांनी शिवसेना नेते निलेश राणे यांना गरजेपेक्षा अतिरिक्त स्वरुपात दिलेले पोलीस संरक्षण कमी करण्यात यावे अशी मागणी केली आहे. गरज नसतानाही निलेश राणेंना मोठ्या स्वरूपाचे पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवडणूक आचारसंहिता सुरु असून, निवडणुकीची धामधूम सुरु आहे. निलेश राणे हे वाय आणि एस स्कॉर्ड दर्जाच्या पोलीस संरक्षणाचा वापर बेकायदेशीररित्या मतदारांवर दबाव निर्माण करण्यासाठी करीत आहेत. पोलीस संरक्षणाची क्रेझ निर्माण होऊन मतदारांवर प्रभाव पाडत आहेत, असा आरोप वैभव नाईक यांनी केला आहे.
पुढे त्यांनी आपल्या पत्रात असं देखील म्हटलं आहे की, निलेश राणेंचा ताफा गेल्यानंतर विनाकारण पोलिसांच्या गाड्यांचे सायरन वाजवले जात असल्याने स्थानिक मतदारांना त्याचा त्रास होत आहे. ग्रामीण भागात अरुंद रस्त्यांमुळे वाहतुकीची समस्या देखील निर्माण होते. त्यामुळे निलेश राणे यांना दिलेले अतिरिक्त पोलीस संरक्षण कमी करावे अशी मागणी वैभव नाईक यांनी केली आहे, त्यामुळे आता ऐन हिवाळ्यात देखील सिंधुदुर्गमधील राजकीय वातावरण तापलं आहे.