IND vs SA: घासून नाय ठासून आला, ऋतुराज गायकवाड याचं कमबॅक, निवड समितीला झुकवलं
GH News November 23, 2025 10:10 PM

क्रिकेट चाहत्यांना भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेचे (India vs South Africa Odi Series 2025) वेध लागले आहेत. सध्या उभयसंघात कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. त्यानंतर 30 नोव्हेंबरपासून 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे. बीसीसीआय निवड समितीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. शुबमन गिल याच्या दुखापतीनंतर केएल राहुल टीम इंडियाचा कॅप्टन असणार आहे. तसेच पुणेकर फलंदाज ऋतुराज गायकवाड याने टीम इंडियाचा दरवाजा तोडला आहे. ऋतुराजने आपल्या कामगिरीच्या जोरावर निवड समितीला पुन्हा एकदा एकदिवसीय संघात स्थान देण्यास भाग पाडलं आहे.

दक्षिण आफ्रिकेने काही दिवसांपूर्वीच एकदिवसीय आणि टी 20i मालिकेसाठी संघ जाहीर केला. टेम्बा बावुमा दक्षिण आफ्रिकेच्या एकदिवसीय संघाचं तर एडन मार्रक्रम टी 20i टीमचं नेतृत्व करणार आहे.  त्यानंतर आता रविवारी 23 नोव्हेंबरला बीसीसीआय निवड समितीने एकदिवसीय संघ जाहीर केला. या मालिकेतील तिन्ही सामने हे अनुक्रमे रांची, रायपूर आणि विशाखापट्टणममध्ये आयोजित करण्यात आले आहेत.

घासून नाय, ठासून आलाय

ऋतुराज गायकवाड याला निवड समितीकडून सातत्याने काही मालिकांमधून वगळण्यात आलं. मात्र ऋतुराजने हार मानली नाही. ऋतुराजने स्वत:वर विश्वास ठेवला. ऋतुराजने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपला धमाका कायम ठेवला होता. ऋतुराजने देशांतर्गत क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा केल्या. तसेच ऋतुराजने नुकत्याच दक्षिण आफ्रिका ए विरुद्ध झालेल्या 3 सामन्यांच्या मालिकेत कमाल केली होती. त्या जोरावर ऋतुराजने भारतीय संघात पुन्हा एकदा धडक दिली. ऋतुराजचं तब्बल 705 दिवसांनंतर भारतीय संघात कमबॅक झालं आहे.

ऋतुराजने 3 वर्षांपूर्वी ऑक्टोबर 2022 साली एकदिवसीय पदार्पण केलं होतं. ऋतुराजला त्यानंतर एकूण 6 सामने खेळण्याची संधी मिळाली. ऋतुराजने अखेरचा एकदिवसीय सामना हा 19 डिसेंबर 2023 रोजी खेळला होता. ऋतुराज त्याच्या अखेरचा एकदिवसीय सामनाही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. तसेच आता ऋतुराजला संधी मिळाल्यास त्याचं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कमबॅक होईल.

ऋतुराज इज बॅक

ऋतुराज गायकवाड याची कामगिरी

भारताने दक्षिण आफ्रिका ए विरुद्धची 3 सामन्यांची मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली होती. ऋतुराजने भारताला मालिका जिंकून देण्यात प्रमुख भूमिका बजावली होती. ऋतुराजने या मालिकेतील 3 सामन्यांमध्ये एकूण 210 धावा केल्या होत्या. ऋतुराजने या मालिकेत 1 शतक आणि 1 अर्धशतक झळकावलं होतं.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.