वालधुनी पुलाजवळ भीषण अपघात
esakal November 23, 2025 10:46 PM

वालधुनी पुलाजवळ भीषण अपघात
ट्रकच्या धडकेत पती-पत्नी गंभीर जखमी

कल्याण, ता. २२ (बातमीदार) : कल्याण पूर्वेकडील वालधुनी पुलाजवळ प्रतिबंधित क्षेत्रात अवजड वाहनांची वाहतूक सुरू असतानाच, एका ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दुचाकीवरील महिला हवेत फेकली गेली, तर तिचा पती ट्रकच्या पुढील चाकाखाली अडकून गंभीर जखमी झाला. नागरिकांनी तातडीने धाव घेतल्यामुळे जीवीतहानी टळली. या प्रकरणी ट्रक चालकाविरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, वालधुनी पुलावर अवजड वाहनांना प्रवेशबंदी असतानाही ट्रकचालकाने ट्रक पुलावर नेला. याच वेळी ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर दुचाकी ट्रकच्या पुढील चाकाखाली घासत काही अंतर पुढे गेली. घटनेनंतर नागरिकांनी आरडाओरड केल्यावर ट्रक चालकाने गाडी थांबवली, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. अपघातामुळे घटनास्थळी काही वेळासाठी वाहतूक ठप्प झाली होती.

गुन्हा दाखल
वालधुनी पुलावर अवजड वाहनांची सतत सुरू असलेली वाहतूक आणि पोलिसांच्या कारवाईचा अभाव याबद्दल परिसरातील नागरिकांनी वाहतूक पोलिस प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. या अपघातानंतर, ट्रक चालकाविरुद्ध कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. ''पूना लिंक रोडवर अवजड वाहने अपघातांना निमंत्रण देत आहेत,'' असे वृत्त दोन-तीन दिवसांपूर्वीच ''सकाळ''ने प्रकाशित केले होते. त्यामुळे, या घटनेनंतर तरी वाहतूक विभाग डोळे उघडणार का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.