WPL 2026 Auction Live: मुंबई इंडियन्सचा अजब डाव! ५.७५पैकी एकाच खेळाडूवर खर्च केले ३ कोटी; कोण आहे ती?
esakal November 28, 2025 04:45 PM

Women's Premier League auction Live Marathi: महिला प्रीमिअर लीगच्या २०२६ साठी झालेल्या मेगा ऑक्शनच्या पहिल्या टप्प्यात सोफी डिव्हाईन, सोफी एक्लेस्टन, एलिसा हिली, अमेलिया केर, मेग लॅनिंग, दीप्ती शर्मा, रेणुका सिंग व लॉरा वॉलव्हार्ड्ट या Marquee खेळाडूंवर बोली लावली गेली. पण, यात दीप्ती शर्माने ( Dipti Sharma) सर्वाधिक भाव खाल्ला. यूपी वॉरियर्सने RTM वापरून दीप्तीला दिल्ली कॅपिटल्सकडून आपल्या संघात कायम घेतले.

लिलावापूर्वी यूपी वॉरियर्सने श्वेता सेहरावत या एकमेव खेळाडूला कायम राखून लिलावासाठी खिशात सर्वाधिक १४.५ कोटी राखले होते आणि त्यांनी लिलावाच्या पहिल्या टप्प्यात जवळपास ४ कोटी रुपये खर्च केले. . मुंबई इंडियन्स व दिल्ली कॅपिटल्स यांनी प्रत्येकी पाच खेळाडूंना कायम राखले आणि आता त्यांच्याकडे अनुक्रमे ५.७५ कोटी व ५.७ कोटी शिल्लक आहेत. मुंबई इंडियन्सने त्यांच्या शिल्लक रकमेतील ३ कोटी रक्कम एकाच खेळाडूसाठी वापरले.

मोठी घोषणा: महिला प्रिमीअर लीग २०२६ च्या तारखा जाहीर, नवी मुंबई व वडोदरा येथे होणार लढती

मार्की प्लेअरमध्ये एलिसा हिली हिचे लिलावासाठी पहिले नाव आले आणि ५० लाख ही तिची मुळ किंमत होती. तिच्यावर कुणीच बोली लावली नाही. त्यानंतर सोफी डिव्हाइन हिचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आले आणि न्यूझीलंडच्या ऑल राऊंडरसाठी ५० लाख मुळ किंमत असताना गुजरात जायट्सने पहिला पॅडल उचलला. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने उडी घेतली. GG vs RCB यांच्यात चुरस सुरू असताना दिल्ली कॅपिटल्सने उडी घेतली. पण, जायंट्सने बोली २ कोटीपर्यंत नेली आणि दिल्लीने माघार घेतली. सोफी २ कोटींत जायंट्सच्या ताफ्यात दाखल झाली.

महिला वर्ल्ड कप गाजवणाऱ्या दीप्ती शर्मासाठी मोठी बोली लागेल अशी अपेक्षा होती. तिने वर्ल्ड कप स्पर्धेत २२ विकेट्स व २१५ धावा केल्या होत्या आणि प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट ठरली होती. तिला दिल्ली कॅपिटल्सने ५० लाखांत आपल्या ताफ्यात घेतले, परंतु यूपी वॉरियर्सने RTM कार्ड वापरला आणि दिल्लीने दीप्तीसाठी त्यांच्याकडे ३.२० कोटी मागितले. यूपीने त्याला होकार दिला आणि दीप्ती ३.२ कोटींत आपल्या माजी सघात परतली.

एमेली केरी पुन्हा स्वगृही परतली आणि मुंबई इंडियन्सने तिला ३ कोटींत आपल्या संघात घेतले. तिने WPL मध्ये २९ सामन्यांत ४३७ धाावा केल्या आहेत आणि ४० विकेट्सही घेतल्या आहेत. न्यूझीलंडच्या या खेळाडूने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त ८८ सामन्यांत १४५३ धावा केल्या आहेत आणि ९५ विकेट्स तिच्या नावावर आहेत.

रेणुका सिंगसाठी गुजरात जायंट्सने ६० लाख मोजले. यूपीने सोफी एक्लेस्टकनसाठी RTM वापरताना दिल्ली कॅपिटल्सकडून ८५ लाखांत तिला आपल्या ताफ्यात घेतले. मेग लॅनिंगसाठी दिल्ली व यूपी असाच सामना रंगलेला पाहायला मिळाला. यूपी वॉरियर्सने मार्की सेटमध्ये तिसऱ्या मोठ्या खेळाडूला आपल्या ताफ्यात घेतले. मेग लॅनिंगसाठी त्यांनी १.९० कोटी मोजले.लॉरा वॉलव्हार्ट्डटला दिल्लीने १.१ कोटीत आपल्या संघात घेतले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.