Healthy Pregnancy tips: लेट प्रेग्नेंसीच्या ट्रेंडमध्ये वाढ, पण आई होण्यासाठी बेस्ट वय कोणतं?
Marathi November 28, 2025 05:25 PM

सध्याच्या काळात लग्नाचं आणि मुलंबाळांचं वय बदलत चाललं आहे. करिअर, आर्थिक स्थैर्य, स्वतःची ओळख निर्माण करण्याचा संघर्ष या सगळ्या कारणांमुळे अनेक महिला उशिरा आई होण्याचा निर्णय घेत आहेत. काही जण लग्नानंतरही काही वर्षे प्लॅनिंग करतात आणि “सगळं सेट झाल्यावरच बाळ” असं ठरवतात. पण या सगळ्यात महिलांचं जैविक वय मात्र थांबत नाही, हे वास्तव आहे. (best age to get pregnant women)

मग प्रश्न असा उभा राहतो की, महिलांसाठी प्रेग्नन्सीसाठी योग्य वय नेमकं कोणतं?
वैद्यकीय अभ्यासानुसार महिलांसाठी 20 ते 34 वर्षांचा काळ हा गर्भधारणेसाठी जास्त अनुकूल मानला जातो. या वयात शरीराची ताकद चांगली असते, अंड्यांची गुणवत्ता तुलनेने चांगली राहते आणि नैसर्गिक पद्धतीने गर्भधारणा होण्याची शक्यता जास्त असते. याचा अर्थ असा नाही की या वयानंतर आई होऊ शकत नाही, पण जोखीम हळूहळू वाढू लागते.

वय वाढल्यावर शरीरात काय बदल होतात?
स्त्रीच्या शरीरात अंड्यांचा साठा जन्मत: ठरलेला असतो. वय वाढत जसजसं पुढे जातं, तसंतशी अंड्यांची संख्या आणि गुणवत्ता कमी होत जाते. 30 नंतर हा बदल हळूहळू सुरू होतो आणि 35 नंतर हा बदल अधिक वेगाने होतो. त्यामुळे उशिरा गर्भधारणा झाल्यास काही अडथळे येण्याची शक्यता वाढते.

35 वर्षांनंतर प्रेग्नन्सीमध्ये काही धोके वाढत असल्याचं पाहायला मिळतं. नैसर्गिक गर्भधारणा उशिरा होणं, गर्भपाताचा धोका वाढणं, ब्लड प्रेशर, साखर वाढणं, जास्त थकवा जाणवणं किंवा सिझेरियनची शक्यता वाढणं असे बदल दिसू शकतात. हे धोके एका दिवसात अचानक वाढत नाहीत, तर हळूहळू वाढणारी प्रक्रिया असते.

आजकाल लोकांना वाटतं की आधुनिक ट्रीटमेंट्समुळे वयाचं काहीच महत्त्व नाही. पण वास्तव थोडं वेगळं आहे. टेक्नॉलॉजीमुळे अनेकांना मदत झाली आहे, पण शरीराचा नैसर्गिक बदल पूर्णपणे थांबवता येत नाही. वय वाढल्यावर उपचारांची यशस्वी शक्यता देखील कमी होत जाते. मात्र याचा अर्थ असा नाही की 35 नंतर आई होणं अशक्य आहे. योग्य काळजी, वेळेवर तपासण्या, संतुलित आहार, योग्य जीवनशैली आणि डॉक्टरांचा सल्ला घेतला तर अनेक महिला निरोगी बाळाला जन्म देतात.

निर्णय घेताना वयाइतकंच महत्त्व खालील गोष्टींना द्यायला हवं.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिलांचं एकूण आरोग्य. थायरॉईड, पीसीओडी, वजन, अ‍ॅनिमिया, मधुमेह या गोष्टी गर्भधारणेवर परिणाम करतात. काही वेळा कमी वयातही अडचण येऊ शकते, तर काही वेळा जास्त वयातही सगळं व्यवस्थित असू शकतं.

दुसरी गोष्ट म्हणजे मानसिक आणि आर्थिक तयारी. बाळ म्हणजे फक्त जैविक बदल नाही, तर संपूर्ण आयुष्य बदलणारं मोठं पाऊल आहे. त्यामुळे “आपण मानसिकदृष्ट्या तयार आहोत का?” हा प्रश्न विचारात घेणं तितकंच गरजेचं आहे. जर 30 वर्षांनंतर प्रयत्न करूनही 6 महिन्यांपर्यंत गर्भधारणा होत नसेल, तर लवकर तपासणी करून घेणं फायद्याचं ठरतं.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.