वाहनांची तोडफोड करणाऱ्या गुंडाला येरवड्यात अटक
esakal November 28, 2025 04:45 PM

पुणे, ता. २७ ः दहशत माजविण्यासाठी वाहनांची तोडफोड करणाऱ्या गुंडाला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. ‘मकोका’ कारवाईत न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता. जामीन मंजूर झाल्यानंतर तो पुन्हा येरवडा भागात आला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
समीर शब्बीर शेख (वय २७, रा. जयजवाननगर, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. शेख हा सराईत गुंड असून, त्याच्यावर यापूर्वी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका), झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्यात आली होती. शेख याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत होता. पसार झालेला शेख हा लोहगाव भागात मित्राला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती खबऱ्याने दिली. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून शेख याला पकडले. दहशत माजविणे, तसेच एकाबरोबर झालेल्या भांडणातून वाहनांची तोडफोड केल्याची कबुली त्याने दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अंजुम बागवान, गुन्हे शाखेचे निरीक्षक विजय ठाकर, उपनिरीक्षक विजय फटांगरे, प्रदीप सुर्वे, महेंद्र शिंदे, मुकुंद कोकणे, शैलेश वाबळे, बालाजी सोगे, भीमराव कांबळे, नटराज सुतार, अतुल जाधव, अक्षय शिंदे, संदीप जायभाय यांनी ही कामगिरी केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.