ध्येय ठरवा, परिश्रम करा आणि संधी साधा
डॉ. सनाउल्लाह घरटकर यांचा सल्ला; वसंतराव नाईक महाविद्यालयात करिअर गाईडन्स शिबिर
मुरूड, ता. ९ (बातमीदार) : जीवनात ध्येय निश्चित केल्याशिवाय संधीचे दरवाजे उघडत नाहीत. सातत्य, परिश्रम आणि योग्य दिशादर्शन मिळाले, तर यश हमखास मिळते, असे मत कतारस्थित उद्योजक डॉ. सनाउल्लाह घरटकर यांनी व्यक्त केले. मुरूड येथील वसंतराव नाईक महाविद्यालयात डॉ. घरटकर फाउंडेशनतर्फे आयोजित करिअर गाईडन्स शिबिरात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर डॉ. सनाउल्लाह घरटकर यांच्यासोबत फाउंडेशनचे अध्यक्ष राशीद फहीम, विश्वस्त शाहिद कलाब, नांदगाव पंचक्रोशी हायस्कूलचे चेअरमन इरफान हलडे, संजीवनी आरोग्य संस्थेचे विभागप्रमुख डॉ. मकबुल कोकाटे, कार्याध्यक्ष विजय सुर्वे, समुपदेशक कीर्ती शहा, वैशाली बोबडे-वैद्य (पुणे), अहसान सैय्यद (जळगाव) व सईदा कारबारी (मुरूड) आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक करताना अध्यक्ष राशीद फहीम म्हणाले की, डॉ. घरटकर फाउंडेशन गेली तीन दशके आरोग्य व शिक्षण क्षेत्रात सामाजिक जाणिवेतून कार्यरत आहे. डॉ. घरटकर विदेशात असले तरी मातृभूमीशी त्यांचे नाते घट्ट आहे. मुरूडच्या मातीतून भविष्यात प्रशासकीय अधिकारी घडावेत या उद्देशाने विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे फहीम यांनी सांगितले. अंजुमन हायस्कूल, मेहबूब इंग्लिश मीडियम स्कूल, विहूर व नचिकेता इंग्लिश स्कूल अशा विविध शाळांमधील ३८० विद्यार्थ्यांना विनामूल्य समुपदेशन देण्यात आले. तसेच १५ गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये रोख पारितोषिक वितरित करण्यात आले. तसेच या वेळी अंजुमन हायस्कूलची कुमारी सफा जामदार (१२ वी विज्ञान) व नचिकेता इंग्लिश स्कूलची विद्यार्थीनी हर्पिता नाईक यांच्या संपूर्ण उच्च शिक्षणाचा खर्च फाउंडेशन उचलेल, अशी घोषणा याप्रसंगी करण्यात आली. या निर्णयामुळे दोन्ही विद्यार्थिनींचा आत्मविश्वास वाढला असून, पालकांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.