खालापूर शहरातील मुख्य रस्त्याची दुरवस्था
खालापूर, ता. ९ (बातमीदार) ः तालुक्याचे ठिकाण आणि नव्याने नगर पंचायतीचा दर्जा मिळूनही खालापूर शहरातील मूलभूत सुविधा अद्याप मार्गी लागलेल्या नाहीत. शहरातील तहसीलदार निवासस्थानापासून न्यायालयापर्यंत जाणारा मुख्य रस्ता अक्षरशः खड्डेमय झाला आहे. रस्त्यावरील डांबर निघून खडी उघडी पडलेली असल्याने मार्गाची अवस्था अत्यंत दयनीय बनली आहे. न्यायालय, शासकीय कार्यालये आणि अंतर्गत शहरापर्यंत जाण्यासाठी हाच एक प्रमुख वाहतुकीचा मार्ग असल्याने नागरिकांच्या गैरसोयीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
दररोज मोठ्या प्रमाणावर वकील, अशील, कर्मचारी यांची वाहने या रस्त्यावर उभी राहत असतात. त्यातच खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यामुळे वाहनांना मार्ग काढणे कठीण होत असून नागरिकांना अक्षरशः मनस्ताप सहन करावा लागत आहे. पायी चालणाऱ्यांनाही ठेच लागण्याची भीती वाटते. एखादे मोठे वाहन आल्यास रस्त्याची रुंदी अपुरी पडत असल्याने येथे वाहतूक कोंडी निर्माण होते. शहराचा सातत्याने वाढणारा विस्तार, वाढती वाहतूक आणि या मार्गाचे प्रशासकीय महत्त्व लक्षात घेता रस्ता दुरुस्तीसाठी तातडीची आवश्यकता आहे. सामाजिक कार्यकर्ते उदय घोलप यांनी या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रत्यक्ष रस्त्यात झोपून अनोखे आंदोलन केले होते; मात्र या धाडसी निदर्शनानंतरही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या हालचालींमध्ये कोणताही बदल दिसला नाही. समस्येचे गांभीर्य लक्षात घेता खालापूरमधील नागरिक आता मोठ्या आंदोलनाच्या तयारीत असून लवकरच रस्ता दुरुस्तीविषयी ठोस निर्णय न झाल्यास तीव्र स्वरूपाचे लक्षवेधी आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांकडून दिला जात आहे.
...............
खासदारांसाठी तातडीची मलमपट्टी
खासदार श्रीरंग बारणे हे दोन वर्षांपूर्वी खालापूर शहरातील एका कार्यक्रमासाठी येणार असल्याची घोषणा होताच प्रशासनाने झटपट रस्त्याची तात्पुरती मलमपट्टी केली होती; मात्र त्यानंतर रस्त्याकडे कधीच लक्ष दिले गेले नाही. आज पुन्हा त्याच रस्त्याची अवस्था बिकट झाल्याने नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.