वाहतूक पोलिसांसाठी बॉडी कॅमेरे सक्तीचे करण्याच्या निर्णयामुळे चलान कापताना होणाऱ्या वादांना चाप बसेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली. सध्या वाहतूक पोलीस आणि नागरिकांमध्ये चलान प्रक्रियेदरम्यान अनेकदा वादविवाद होतात. यामध्ये काही नागरिक आपली ओळख किंवा प्रभावशाली व्यक्तींशी संबंधांचा हवाला देत वाद घालतात. या सर्व प्रकारच्या भांडणांना आळा घालण्यासाठी बॉडी कॅमेऱ्यांचा वापर महत्त्वाचा ठरणार आहे. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, वाहतूक पोलिसांकडे बॉडी कॅमेरा असेल तरच त्यांना चलान कट करता येईल. हा नियम टप्प्याटप्प्याने राज्यभर लागू करण्यात येणार आहे. बॉडी कॅमेऱ्यांमुळे केवळ वाद कमी होणार नाहीत, तर भविष्यात जर कोणतीही कायदेशीर समस्या उद्भवल्यास ती सोडवण्यासाठी पुरावा म्हणूनही त्याचा उपयोग होईल. शासनाच्या या निर्णयामुळे वाहतूक पोलिसांच्या कामकाजात अधिक पारदर्शकता आणि जबाबदारी येईल, अशी अपेक्षा आहे.