टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी अवघ्या काही दीड महिन्यांचा अवधी शिल्लक राहिला आहे. 7 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान ही स्पर्धा भारत आणि श्रीलंका येथे होणार आहे. यजमानपद भारत श्रीलंकेकडे असल्याने चाहत्यांसाठी पर्वणी आहे. कारण प्रत्यक्ष मैदानात उपस्थित राहून सामना पाहता येणार आहे. यासाठी गेल्या काही दिवसांपासून क्रीडाप्रेमी फिल्डिंग लावून होते. कधी तिकीट विक्री सुरू होते यासाठी विचारणा करत होते. आता ती प्रतीक्षा संपली आहे. कारण आयसीसीने या स्पर्धेसाठीची तिकीट विंडो सुरु केली आहे. आयसीसीने 11 डिसेंबर 2025 रोजी याबाबतची माहिती शेअर केली आहे.
आयसीसीने एक्स हँडलवर माहिती शेअर करताना लिहिलं आहे की, “तुमची सीट तुमची वाट पाहत आहे. आयसीसी पुरुष T20 World Cup 2026 साठी तुमची तिकिटे 11 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6:45 वाजता विक्री सुरू होईल तेव्हा खरेदी करा आणि जगभरातील चाहत्यांसह स्टँडमध्ये सामील व्हा.” आयसीसीने अधिकृत खात्यावरच तिकीट विक्रीसंदर्भात माहिती पोस्ट केली. चाहते https://tickets.cricketworldcup.com/ ला भेट देऊन तिकिटांची खरेदी करू शकतात . भारतात नरेंद्र मोदी स्टेडियम, (अहमदाबाद), एमए चिदंबरम स्टेडियम, (चेन्नई),अरुण जेटली स्टेडियम, (दिल्ली), ईडन गार्डन्स, (कोलकाता), वानखेडे स्टेडियम, (मुंबई) या ठिकाणी सामने होतील. तर श्रीलंकेत आर. प्रेमदासा स्टेडियम कोलंबो, सिंहलीज स्पोर्ट्स क्लब क्रिकेट ग्राउंड कोलंबो आणि पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, कँडी येथे सामने होतील. भारतातील काही ठिकाणी किंमती फक्त 100 (अंदाजे $1.11) आणि श्रीलंकेत RKR1000 (अंदाजे $3.26) पासून सुरू होतात.
भारत आणि श्रीलंका या देशाकडे या स्पर्धेचं यजमानपद आहे. टी20 वर्ल्डकपचं हे 10वं पर्व आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघ भाग घेणार आहेत. त्यासाठी एकूण 5 संघाचे चार गट तयार केले आहेत. प्रत्येक गटातील टॉप दोन संघांना सुपर 8 मध्ये खेळण्याची संधी मिळेल. पहिला सामना कोलंबोमध्ये नेदरलँड्स आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जाईल. त्यानंतर बांगलादेश आणि वेस्ट इंडिज, तसेच भारत आणि अमेरिका हे संघ खेळतील. भारताने मागच्या पर्वात जेतेपदावर नाव कोरलं होतं. मात्र यावेळी जेतेपद राखण्याचं मोठं आव्हान आहे. तसेच भारतातच स्पर्धा होत असल्याने दबाव असणार आहे.