Teacher Video Viral : अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन; शाळेत घुसून शिक्षकाला बेदम मारहाण, व्हिडिओ तुफान व्हायरल
esakal December 13, 2025 01:45 PM

बेळगाव : बेळगुंदी येथील एका शाळेतील शिक्षकाने (Belagav School Case) आपल्याच शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन (Minor Student Abuse) केल्याचा गंभीर आरोप समोर आला असून, या प्रकरणामुळे गावात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले. माहिती पसरताच गावकऱ्यांनी शुक्रवारी (ता. १२) शाळेत धाव घेत शिक्षकाला बेदम मारहाण केली.

पोलिसांनी मोठ्या प्रयत्नाने शिक्षकाला गावकऱ्यांच्या तावडीतून बाहेर काढत ताब्यात घेतले. याप्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला नाही. दरम्यान, शिक्षकाला निलंबित करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बेळगुंदी शाळेतील एक शिक्षक मागील काही दिवसांपासून आपल्या शाळेतील काही अल्पवयीन विद्यार्थिनींशी अवाजवी जवळीक साधण्याचा संशय व्यक्त होत होता. मोबाईलवरून संदेश पाठविणे, विद्यार्थिनींसोबत अनावश्यक फोटो काढणे, अशा प्रकारांची चर्चा पालकांमध्ये सुरू होती. त्यानंतर एका विद्यार्थिनीने पालकांना शिक्षकाविरोधात गैरवर्तनाचा गंभीर आरोप केला.

Nashik Crime : चारित्र्याच्या संशयातून रामकुंडावर श्राद्धविधींना मदत करणाऱ्या विवाहितेला पतीनं संपवलं; बुटाच्या लेसने आवळला गळा

कुटुंबीयांकडून तक्रार व्यक्त झाल्यानंतर गावात या प्रकरणाची माहिती वाऱ्यासारखी पसरली. आणखी काही विद्यार्थिनींनीही तसाच अनुभव आल्याची माहिती पुढे आली आहे. यानंतर संतप्त ग्रामस्थांनी शाळेकडे कूच करत शिक्षकाला बाहेर ओढले आणि बेदम चोप दिला. विद्यार्थिनींचा देखील रोष अनावर झाला आणि त्यांनीही शिक्षकाला मार दिला. घटनास्थळावरून पळ काढण्याचा शिक्षकाने प्रयत्न केला.

मात्र, गावकऱ्यांनी पाठलाग करून त्याला पकडून ठेवले. काहींनी तातडीने पोलिसांना फोन करून माहिती दिली. पोलिसांनी गावात पोहोचून शिक्षकाला जीपमध्ये बसविण्याचा प्रयत्न केला असता विद्यार्थिनींनी जीपसमोर बसून शिक्षकाला तत्काळ ताब्यात घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली. पोलिसांनी बराच वेळ समजूत काढल्यानंतर परिस्थिती आटोक्यात आली आणि शिक्षकाला ठाण्यात नेले.

View this post on Instagram

A post shared by Voice Of Venugram (@voiceofvenugram)

दरम्यान, या प्रकरणात राजकीय दबाव टाकून घटना दडपण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चादेखील आहे. प्रकरणाकडे पोलिस कशा प्रकारे पाहतात आणि गुन्हा नोंदीची पुढील प्रक्रिया कशी होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. गावकऱ्यांचा संताप, पालकांची चिंता आणि विद्यार्थिनींवर झालेला मानसिक परिणाम यांमुळे हा संपूर्ण प्रकार अत्यंत गंभीर मानला जात आहे. कायदा सुव्यवस्था राखण्याबरोबरच पीडितांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याची मागणी होत आहे.

Kolhapur Accident : बिरदेव मंदिराजवळ भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत महिला जागीच ठार, दीड वर्षाचा सार्थक थोडक्यात... पडसाद राज्यभर उमटणार?

शिक्षण खात्यानेदेखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, बेळगुंदी विभागाच्या केंद्रप्रमुखांना या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेण्याच्या सूचना केल्या आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत शिक्षण खात्याचे अधिकारीदेखील या प्रकरणावर लक्ष ठेवून होते. बेळगावात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच हा प्रकार घडला आहे. त्याचे मोठे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. सायंकाळी सहा वाजता बेळगाव तालुका गट शिक्षणाधिकारी अंजनेय, तालुका शारीरिक शिक्षण अधिकारी साधना बदरी, बीआरसी श्री. बडीगेर, सीआरसी एस. आर. रेडेकर यांनी बेळगुंदी शाळेला भेट देऊन शाळा प्रशासनाकडून घटनेची माहिती घेतली.

संशयित आरोपी असलेल्या शिक्षकाची चौकशी सुरू असून, तातडीने त्याला निलंबित करण्यात आले आहे. शिक्षकाला निलंबित करण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन मंडळावर असून, त्यांच्याकडून आपण माहिती घेतली आहे.

- लीलावती हिरेमठ, जिल्हा शिक्षणाधिकारी, बेळगाव

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.