माझ्या बायकोला..; सतत घटस्फोटाच्या बातम्या वाचून भडकला अभिषेक, ऐश्वर्याबद्दल स्पष्टच म्हणाला..
Tv9 Marathi December 11, 2025 04:45 PM

अभिनेता अभिषेक बच्चन आणि त्याची पत्नी ऐश्वर्या राय बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा काही नवीन नाहीत. गेल्या काही महिन्यांपासून या दोघांच्या विभक्त होण्याच्या अनेकदा अफवा पसरल्या आहेत. इतकंच नव्हे तर ऐश्वर्या तिच्या आई आणि मुलीसोबत वेगळी राहत असल्याचंही म्हटलं गेलं. या चर्चांवर आजवर हे दोघं कधीच व्यक्त झाले नव्हते. परंतु आता पहिल्यांदाच अभिषेकने घटस्फोटाच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. ऐश्वर्या आणि अभिषेकने 2007 मध्ये लग्न केलं. तर 2011 मध्ये ऐश्वर्याने आराध्याला जन्म दिला. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नातही अभिषेक त्याच्या संपूर्ण कुटुंबीयांसोबत पोहोचला होता. मात्र फक्त ऐश्वर्या आणि तिची मुलगी आराध्या वेगळ्या आल्या होत्या. यामुळे घटस्फोटाच्या चर्चांना आणखी हवा मिळाली. याआधी 2014 मध्येही या दोघांच्या नात्यात काही आलबेल नसल्याच्या चर्चा होत्या.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जेव्हा अभिषेकला घटस्फोटाच्या चर्चांबद्दल विचारलं गेलं, तेव्हा तो म्हणाला, “आमचं लग्न कधी होणार, याबाबत जाणून घेण्याची आधी त्यांना उत्सुकता होती. आता आमचा घटस्फोट कसा होणार याबद्दल ते चर्चा करत आहेत. माझ्या बायकोला माझं सत्य माहीत आहे आणि मला तिचं सत्य माहीत आहे. आमचं कुटुंब आनंदी आणि निरोगी आहे. हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे.”

स्वत: इंडस्ट्रीत काम करत असल्यामुळे आणि पत्नीसुद्धा अभिनेत्री असल्यामुळे अशा अफवांना कसं सामोरं जायचं हे माहीत असल्याचं त्याने स्पष्ट केलं. “फिल्म इंडस्ट्रीत लहानाचं मोठं झाल्याचा आणि फिल्म इंडस्ट्रीत काम करणारी पत्नी असल्याचा हा एक फायदा असतो. माझ्या मनात मीडियाविषयी फार आदर आहे, परंतु अनेकदा त्यांनी दिलेलं वृत्त हे चुकीचं असतं. मीडिया हा देशाचा विवेक आहे. आजच्या वेगवान काळात सर्वांत आधी बातमी ब्रेक करण्याची घाई सर्वांना असते आणि त्यामागचा दबाव मी समजू शकतो. पण तुम्ही कशासाठी इथे आहात”, असा सवाल त्याने केला.

याविषयी तो पुढे म्हणाला, “शेवटी तुम्ही एका माणसाबद्दल बोलत आहात. एखाद्याच्या वडिलांबद्दल, पतीबद्दल बोलत आहात. त्यामुळे काही प्रमाणात जबाबदारीचं भान असायलाच हवं. जर तुम्ही माझ्या कुटुंबाबद्दल बोलणार असाल तर मी ते सहन करू शकत नाही, कारण ते मर्यादेपलीकडचं आहे. हा शब्द कदाचित कठोर वाटू शकतो, परंतु मी हे अहंकाराने बोलत नाहीये. मी माझ्या कुटुंबाबद्दल कोणतीही बदनामी सहन करणार नाही. इथेच मी पूर्णविराम देतो. त्यांच्याबद्दल मी एकही वाईट शब्द ऐकून घेणार नाही.”

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.