नवी मुंबईत पर्वतदिन मोहीम
esakal December 11, 2025 04:45 PM

नवी मुंबईत पर्वतदिन मोहीम
टेकड्या वाचवण्यासाठी सायकल रॅली
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १० ः वाढत्या औद्योगिकीकरणामुळे शहरातील टेकड्या गिळंकृत होत आहेत. या टेकड्या वाचवण्यासाठी पर्यावरणप्रेमींकडून टेकडी बचाव मोहिमेची हाक दिली आहे. यानिमित्ताने गुरुवारी (ता. ११) सायकल रॅली काढण्यात येणार आहे.
जागतिक थीम पाणी, अन्न आणि उपजीविकेला आधार देण्यात हिमनद्यांची भूमिका अधोरेखित करते; परंतु नवी मुंबईत टेकड्यांच्या अस्तित्वाला धक्का लागला आहे. अनियंत्रित उत्खनन, सपाटीकरण प्रदेशातील नैसर्गिक टेकड्या गिळंकृत करीत आहेत. नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांच्या म्हणण्यानुसार, नवी मुंबईतील टेकड्या वाचवाव्या लागतील. तर खारघर वेटलँड्स अँड हिल्स फोरमच्या संयोजक ज्योती नाडकर्णी यांनी पांडवकडा धबधब्याचे जतन करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. हा परिसर जबाबदार पर्यावरणीय पर्यटन म्हणून विकसित करता येईल. तसेच एक प्रमुख जलस्रोत म्हणूनही काम करेल, असे सांगितले. याच अनुषंगाने स्थानिक डोंगरांच्या जैवविविधतेवर जागरूकता सत्रे, खारघर पर्वतरांगांवर छायाचित्र प्रदर्शन, स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येणार आहे. तर रविवारी (ता. १४) उत्सव चौक ते फणसवाडीपर्यंत सायकल रॅली काढण्यात येणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.