कल्याणच्या वाहतूक पोलिसांचा अजब कारभार
गाडी गॅरेजमध्ये असताना ‘नो पार्किंग’चा ठपका ः ई-चलान भरण्यास चालकाचा नकार
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १० ः गाडी प्रत्यक्षात गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी असताना तिच्यावर नो पार्किंगचा ठपका ठेवत वाहतूक विभागाकडून चालकाला ई-चलान पाठविण्याचा प्रकार कल्याणमध्ये समोर आला आहे. या प्रकारामुळे वाहतूक पोलिसांच्या गलथान कारभाराचा पुन्हा एकदा पर्दाफाश झाला आहे. ई-चलान मिळालेल्या चालकाचे नाव विलास कर्वे असे असून, प्रश्न पैशाचा नाही; चुकीच्या पद्धतीने नागरिकांना दंड ठोठावून लूट केली जात आहे. त्यामुळे मी हा दंड भरणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, याबाबत तक्रार करूनही अद्याप वाहतूक विभागाकडून योग्य प्रतिसाद मिळालेला नाही, अशीही माहिती त्यांनी दिली.
कल्याण पश्चिमेतील कशिश पार्क येथे राहणारे विलास कर्वे यांच्या चारचाकी वाहनात १७ ऑक्टोबर रोजी बिघाड झाला. त्यामुळे त्यांनी गाडी कल्याण पश्चिमेतील प्रेम ऑटो परिसरातील गॅरेजमध्ये सकाळी ९ वाजता दुरुस्तीसाठी दिली होती. दुरुस्ती झाल्यानंतर गाडी त्याच दिवशी संध्याकाळी सातच्या सुमारास ते घरी घेऊन आले, मात्र काही दिवसांनी त्यांना वाहतूक विभागाकडून ई-चलान प्राप्त झाले. त्यात गाडी कल्याण पूर्वेतील पत्रीपूल परिसरातील नो पार्किंगमध्ये उभी असल्याचे नमूद करण्यात आले असून, ५०० रुपयांचा दंड आकारला होता. प्रत्यक्षात त्या दिवशी गाडी दिवसभर गॅरेजमध्ये होती.
दंडात्मक कारवाईची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी कारवाई
वाहनाची योग्य ती शहानिशा न करता थेट नागरिकांना ई-चलान पाठवले जातात, हे यातून स्पष्ट दिसत आहे. दंडात्मक कारवाईची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी अशा प्रकारचे चलान जारी केले जातात काय, असा प्रश्नही कर्वे यांनी उपस्थित केला आहे. कर्वे यांनी वाहतूक शाखेकडे तक्रार केली असता, शहानिशा करण्याऐवजी त्यांच्या तक्रारीची सरसकट बोळवण करण्यात आली आणि पाठविलेले ई-चलान बरोबर असल्याचा दावा करण्यात आला.