IMD weather update : राज्यात थंडीची मोठी लाट, तब्बल इतक्या जिल्ह्यांना अलर्ट जारी, पुढील 48 तास..
Tv9 Marathi December 12, 2025 03:45 PM

देशभरात कडाक्याची थंडी वाढली असून पुढील काही दिवस अधिक गारठा वाढण्याचा इशारा आहे. अनेक भागांमध्ये दाट धुके आणि शीत लाटा पसरल्या आहेत. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, उत्तर भारत आणि पंजाब येथे पारा सतत घसरत आहेत. उत्तरेकडे वाढलेल्या थंडीमुळे राज्यातही गारठा चांगलाच वाढला. काही जिल्ह्यांमध्ये 5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उत्तरेकडून थंडगार वारे येत आहे. दरम्यान, केरळ, तामिळनाडू आणि अंदमान आणि निकोबार येथे मुसळधार पाऊस असून पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला. देशाच्या दोन भागांमध्ये परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. एकीकडे कडाक्याची थंडी तर दुसरीकडे अतिमुसळधार पाऊस पडताना दिसत आहे. नुकताच राज्यात थंडीच्या लाटेचा मोठा इशारा देण्यात आला.

मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील दोन दिवस थंडीची लाट कायम राहणार आहे. आहिल्यानगर, सोलापूर, पुणे, धुळे, जळगाव, नाशिक या जिल्ह्यांमध्ये थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला. नांदेड, लातूर, हिंगोली, परभणी, बीड, छत्रपती संभाजीनगर, गोदिया, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. पुढील 5 दिवसात कमाल तापमानात फार काही बदल होण्याची शक्यता नाही.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, हिमाचल प्रदेश, ओडिशा, आसाम आणि मणिपूरमध्ये सकाळच्या वेळी दाट धुके पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासह पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड, ओडिशा राज्यांसाठीही थंडीच्या लाटेचा इशारा जारी करण्यात आला आहे. पुढील काही दिवसात कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाचे म्हणणे आहे.

नोव्हेंबरच्या सुरूवातीच्या आठवड्यातील पाऊस बघायला मिळाला. डिसेंबरच्या सुरूवातीपासूनच थंडीची लाट आली. पूर्ण डिसेंबर महिना थंडी राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाचा आहे. पूर्व उत्तर प्रदेशात थंडीच्या लाटेमुळे गारठ्यात अचानक वाढ झाली आहे. उत्तर भारतात थंडी वाढत असल्याने त्याचा थेट परिणाम राज्यात दिसत असून थंडी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. थंडीचा कडाका वाढल्याने आरोग्य समस्या देखील मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.