दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या टी२० सामन्यात भारताचा ५१ धावांनी पराभव झाला.
शुभमन गिल पहिल्याच चेंडूवर बाद झाल्यानंतर तिलक वर्मा वगळता इतर भारतीय फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली.
सूर्यकुमार यादवने पराभवाचे कारण फलंदाजांचे अपयश असल्याचे मान्य केले.
भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. मुल्लनपूरला झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ५१ धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. या सामन्यातील पराभवासाठी भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने फलंदाजांचे अपयश कारण ठरल्याचे मान्य केले.
IND vs SA: तब्बल ७ वाईड अन् १३ चेंडूंची एक ओव्हर! अर्शदीपवर प्रचंड भडकला गौतम गंभीर; Video Viralया सामन्यात दक्षिण आफ्रिकेने क्विंटन डी कॉकच्या ९० धावांच्या खेळीच्या जोरावर २० षटकात ४ बाद २१३ धावा केल्या होत्या. त्यानंतर २१४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा डाव १९.१ षटकात १६२ धावांवर संपला. भारतासाठी तिलक वर्माने सर्वाधिक ६२ धावा केल्या. भारताने सुरुवातीलाच ४ षटकांच्या आत ३२ धावांवर ३ विकेट्स गमावल्या होत्या.
शुभमन गिल पहिलाच चेंडू खेळताना शून्यावर बाद झाला. त्यानंतर अभिषेक शर्मा १७ धावांवर आणि सूर्यकुमार ५ धावांवर बाद झाला. सुरुवातीलाच झटपट विकेट्स गमावल्यानंतर भारतासमोरील दबाव वाढला. त्यातच शेवटच्या चार विकेट्स भारताने ७ चेंडूंमध्येच गमावल्या.
या पराभवानंतर सूर्यकुमार म्हणाला, 'मग मला वाटतं की आम्ही आधी फलंदाजी करायला हवी होती. म्हणजे आम्ही आधी गोलंदाजी केली आणि त्यावेळी आम्ही फार काही करू शकलो नाही. नंतर त्यांना जाणवलं की या खेळपट्टीवर लेंथ किती महत्त्वाची आहे. पण हो, ही शिकण्याची प्रक्रिया आहे. यातून शिकायचं आणि पुढे जायचंय.'
'थोडं दवंही होत आणि जर एक प्लॅन काम करत नव्हता, तर आमच्याकडे दुसरा प्लॅन असायला हवा होता. पण आम्ही त्याकडे गेलो नाही. पण ठीक आहे, मी जसं म्हटलो की ही शिकण्याची प्रक्रिया आहे. त्यांनी दुसऱ्या डावात कशी गोलंदाजी केली, हे आम्ही शिकलो. आम्ही जे शिकलो, ते पुढच्या सामन्यात अंमलात आणण्याचा प्रयत्न करू.'
फलंदाजांच्या अपयशाबद्दल बोलताना सूर्यकुमार म्हणाला, 'मला वाटतं मी आणि शुभमन आम्ही चांगली सुरुवात द्यायला हवी होती. कारण आम्ही प्रत्येकवेळी अभिषेक शर्मावर अवलंबून राहू शकत नाही. तो ज्याप्रकारे फलंदाजी करतोय, ते पाहाता एखादा दिवस त्याच्यासाठी खराब असू शकतो. मी शभमन आणि इतर फलंदाजांनी अशावेळी जबाबदारी घ्यायला हवी होती. मला वाटते हुशारीने धावांचा पाठलाग करायला हवा होता. पण ठीक आहे.'
'शुभमन पहिल्या चेंडूवर बाद झाला, त्यानंतर मी जबाबदारी घ्यायला हवी होती आणि आणखी फलंदाजी करायला हवी होती. पण मी म्हटलो तसं आम्ही शिकू आणि सुधारणा करत पुढे जाऊ.'
IND vs SA, 2nd T20I: तिलक वर्मा एकटा लढला, वादळी फिफ्टीही ठोकली; पण टीम इंडिया ऑलआऊट अन् द. आफ्रिकेचा मोठा विजयया सामन्यात अक्षर पटेलला तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळाली होती. त्याने २१ चेंडूत २१ धावांची खेळी केली. त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्याबद्दल सूर्यकुमार म्हणाला, 'आम्ही मागच्या सामन्यातच विचार केला होता की आम्ही अक्षरला वनडे आणि कसोटीत चांगली फलंदाजी करताना पाहिले आहे. आम्हाला त्याला फलंदाजीसाठी आजच्याप्रमाणेच पाठिंबा द्यायचा आहे. दुर्दैवाने आज त्याचा फायदा झाला नाही. त्याला चांगली फलंदाजी करता आली नाही. आता पुढच्या सामन्यात काय होतंय पाहू.'
भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा टी२० सामना रविवारी (१४ डिसेंबर) धरमशाला येथे होणार आहे.