भटक्या श्वानांचा निवारा
esakal December 12, 2025 03:45 PM

भटक्या श्वानांच्या निवाऱ्याचे आव्हान
जागा उपलब्ध होत नसल्याने पालिकेसमोर पेच
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : भटक्या श्वानांकडून अनेकदा रस्त्यावरून चालणाऱ्याला अथवा दुचाकीला लक्ष्य करण्यात येत असते. त्यामुळे भटके श्वान आणि मानव यांच्यात संघर्ष होत असल्याचे दिसून येत आहे. हा संघर्ष टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने भटक्या श्वानांना पकडून त्यांना निवारा केंद्रात ठेवण्याचे निर्देश दिले, मात्र जागा उपलब्ध होत नसल्याने श्वानांसाठी निवारा केंद्र उभारण्याचे आव्हान स्थानिक स्वराज्य संस्थांपुढे उभे ठाकले आहे.
राज्यभरात शहरी भागासह ग्रामीण भागात भटक्या श्वानांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ झालेली आहे. त्यात भटक्या व पिसाळलेल्या भटक्या श्वानांकडून रस्त्यावरून अथवा दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना, लहान मुलांना चावा घेण्याचे प्रकार घडत आहेत. भटक्या श्वानांच्या उपद्रवामुळे काही नागरिक श्वानांना मारहाणही करतात. त्यामुळे भटके श्वान आणि मानव यांच्यात संघर्ष वाढला आहे. सर्वोच्च न्यायालयाने भटक्या श्वानांसंदर्भात महत्त्वाचे आदेश दिले होते. त्यानुसार राज्य शासनाने भटक्या श्वानांसाठी नियमावली तयार केली असून, त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश महापालिका, नगरपालिका आणि नगर पंचायतींना दिले आहेत. यामध्ये भटक्या श्वानांना पकडून त्यांची व्यवस्था निवारा केंद्रात करावी, असे नियमावलीत म्हटले आहेत. दरम्यान, ठाणे महापालिका क्षेत्रात २५ हजारांच्या आसपास भटके श्वान आहेत. अशाचप्रकारे इतर पालिका क्षेत्रातही श्वानांची संख्या मोठी आहे. शहर विस्तारत असल्याने शहरात पुरेशा मोकळ्या जागा उपलब्ध नाहीत.

निवारा केंद्राच्या जागेचा पेच
शहरातील सर्वच श्वानांना एकाच ठिकाणी ठेवण्यासाठी आश्रयस्थान उभारणीकरिता मोठी जागा लागणार आहे. या भटक्या श्वानांच्या भुंकण्याच्या आवाजाचा परिसरातील नागरिकांना त्रास होऊ नये, याचीही काळजी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी ध्वनिरोधक भिंती उभाराव्या लागणार आहेत. असे असले तरी निवारा केंद्राच्या जागेचा पेच निर्माण झाला आहे.

पालिका विरुद्ध प्राणीप्रेमी
भटक्या श्वानांना निवारासाठी यापूर्वी नेमलेल्या समितीला अशी ठिकाणे निवडण्याचे अधिकार देण्यात आले होते. त्यांनीही काही ठिकाणे यापूर्वीच निवडली असून, त्यास नागरिकांचा विरोध होत आहे. त्यामुळे ही ठिकाणे बंद करून नवीन ठिकाणे सुरू करण्यावरून पालिका विरुद्ध प्राणीप्रेमी असा वाद सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.