NZ vs WI : न्यूझीलंडचा 9 विकेट्सने दणदणीत विजय, विंडीजचा तिसऱ्याच दिवशी धुव्वा
Tv9 Marathi December 12, 2025 08:45 PM

वेस्ट इंडिज क्रिकेट टीमने न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या कसोटीत चिवट झुंज देत सामना अनिर्णित राखला होता. मात्र न्यूझीलंडने दुसऱ्या कसोटी सामन्यात पाहुण्या विंडीजचा करेक्ट कार्यक्रम केला आहे. न्यूझीलंडने विंडीजवर 9 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. विशेष म्हणजे न्यूझीलंडने विंडीजचा तिसऱ्याच दिवशी पॅकअप केलं. या सामन्यांच आयोजन हे वेलिंग्टनमधील बेसिन रिझर्व्ह स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. न्यूझीलंडने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. न्यूझीलंडने विजयासह मालिका विजयाचा दावा ठोकला आहे. तर आता विंडीजला मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी तिसर्‍या आणि अंतिम सामन्यात कोणत्याही स्थितीत विजय मिळवावा लागणार आहे.

न्यूझीलंडने या सामन्यात बॅटिंगसह बॉलिंगमध्येही दम दाखवला. न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर विंडीजने गुडघे टेकले. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी केलेल्या कामागिरीमुळे विंडीजवर तिसर्‍या दिवशी मात करता आली. न्यूझीलंडने विंडीजला दोन्ही डावात यशस्वीरित्या मोठी धावसंख्या करण्यापासून रोखलं.

सामन्यात काय झालं?

न्यूझीलंडच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. न्यूझीलंडने विंडीजला बॅटिंगसाठी भाग पाडलं. न्यूझीलंडने विंडीजला 205 रन्सवर ऑलआऊट केलं. विंडीजसाठी शाई होप याने सर्वाधिक 47 धावांचं योगदान दिलं. जॉक कँपबेल याने 44 धावा केल्या. ब्रँडन किंग याने 33 तर रोस्टन चेज याने 29 रन्सची भर घातली. त्या व्यतिरिक्त विंडीजच्या एकाही फलंदाजाला 20 धावाही करता आल्या नाहीत.

विंडीजला झटपट गुंडाळण्यात ब्लेअर टिकनर आणि मायकल राय या दोघांनी प्रमुख भूमिका बजावली. ब्लेअरने 4 तर मायकलने 3 विकेट्स घेत विंडीजच्या बॅटिंगचं कंबरडं मोडलं. तर जेकब डफी आणि ग्लेन फिलिप्स या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

न्यूझीलंडकडून पहिला डाव घोषित

विंडीजला स्वस्तात गुंडाळल्यानंतर न्यूझीलंडला आणखी आघाडी घेण्याची संधी होती. मात्र न्यूझीलंडच्या एका निर्णयाने क्रिकेट चाहत्यांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात आलं. न्यूझीलंडने 1 विकेटआधी डाव घोषित केला. पहिला डाव 9 बाद 278 धावांवर घोषित केला. न्यूझीलंडला 73 धावांची आघाडी मिळाली.

न्यूझीलंडसाठी मिशेल याने सर्वाधिक 61 धावा केल्या. तर डेव्हॉन कॉनव्हे याने 60 धावांचं योगदान दिलं. या दोघांव्यतिरिक्त एकालाही अर्धशतकी खेळी करता आली नाही. अनुभवी फलंदाज केन विलियमसन याने 37 रन्स करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. विंडीजसाठी अँडरसन फिलीप न्यूझीलंडच्या 3 फलंदाजांना आऊट केलं. तर केमार रोच याने 2 विकेट्स घेतल्या.

जेकब डफीचा ‘पंच’

त्यानंतर न्यूझीलंडच्या जेकब डफी याच्या धारदार बॉलिंगसमोर विंडीजला दुसऱ्या डावात 130 पारही पोहचता आलं नाही. न्यूझीलंडने विंडीजला 128 रन्सवर गुंडाळलं. जेकबने 38 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स मिळवल्या. तर मायकल राय याने 3 विकेट्स घेतल्या. त्यामुळे न्यूझीलंडला विजयासाठी 56 धावांचं माफक आव्हान मिळालं. न्यूझीलंडने हे आव्हान 1 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पूर्ण करत सामना क्रिकेट सामना जिंकला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.