IND vs SA : हेड कोच गौतम गंभीर याच्यामुळे टीम इंडियाचा गेम? टी 20I वर्ल्ड कपआधी धोक्याची घंटा
GH News December 12, 2025 09:11 PM

टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 सामन्यांच्या टी 20I मालिकेत विजयी सलामी दिली. त्यामुळे भारताला सलग दुसरा सामना जिंकून आघाडी आणखी भक्कम करण्याची संधी होती. मात्र गुरुवारी 11 डिसेंबरला दक्षिण आफ्रिकेने कमबॅक करत मालिकेत बरोबरी साधली. दक्षिण आफ्रिकेने 214 धावांचा पाठलाग करणाऱ्या टीम इंडियाला 162 रन्सवर गुंडाळलं. दक्षिण आफ्रिकेने या विजयासह मालिकेत विजयाचं खातं उघडलं. सोबतच पहिल्या पराभवाची परतफेडही केली.

टीम इंडियाच्या गोलंदाजांसह फलंदाजांनी या सामन्यात निराशा केली. त्या व्यतिरिक्त टीम इंडियाच्या बॅटिंग ऑर्डरमध्ये अनावश्यक बदल करण्यात आले. हेच बदल टीम इंडियाच्या पराभवाला कारणीभूत असल्याचं क्रिकेट चाहत्यांचं म्हणणं आहे. हेड कोच गौतम गंभीर याने बॅटिंग ऑर्डरमध्ये काही बदल केले. मात्र हा प्रयोग फसला. परिणामी टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला.

गौतम गंभीर जबाबदार का?

गौतम गंभीर बॅटिंग पोजिशनला ओव्हररेटेड समजतात. गंभीरने व्हाईट बॉल (वनडे आणि टी 20i) क्रिकेटमधील बॅटिंग ऑर्डर ओव्हररेटेड असल्याचं म्हटलं होतं. सलामी जोडीचा अपवाद वगळता इतर सर्व फलंदाजांना कोणत्याही स्थानी बॅटिंग करण्यासाठी सज्ज असायला हवं, असं गंभीरचं म्हणणं आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी 20i सामन्यात तसंच झालं. त्यामुळे संतुलन बिघडलं आणि टीम इंडियाचा पराभव झाला.

बॅटिंग ऑर्डरसोबत गेम!

टीम इंडियाचा उपकर्णधार शुबमन गिल पुन्हा एकदा फ्लॉप ठरला. ओपनिंगला आलेल्या शुबमनला भोपळाही फोडता आला नाही. शुबमन पहिल्याच बॉलवर आऊट झाला. निराशाजनक सुरुवात झाल्यानंतर तिसर्‍या स्थानी नेहमीप्रमाणे कॅप्टन सूर्यकुमार यादव येणं अपेक्षित होतं. मात्र त्या जागी चक्क अक्षर पटेल याला पाठवण्यात आलं. अक्षरने 214 धावांचा पाठलाग करताना 100 च्या सुमार स्ट्राईक रेटने धावा केल्या. अक्षर 21 बॉलमध्ये 21 रन्स करुन आऊट झाला. त्यामुळे टीम इंडियावर दबाव वाढला.

सूर्या चौथ्या स्थानी

आता अक्षरला तिसऱ्या स्थानी पाठवल्याने पूर्ण बॅटिंग ऑर्डरवर कसा परिणाम झाला हे जाणून घेऊयात. कॅप्टन सूर्यकुमार यादव चौथ्या स्थानी बॅटिंगसाठी आला. सूर्याने विक्रमी धावांचा पाठलाग करताना निराशा केली. सूर्या 5 धावांवर बाद झाला.

तिलक वर्मा पाचव्या स्थानी

तिलक वर्मा पहिल्या टी 20i सामन्यात तिसऱ्या स्थानी खेळलेला. मात्र तिलकला या सामन्यात पाचव्या स्थानी बॅटिंगची संधी मिळाली. तिलकने सर्वाधिक आणि 62 धावांची झुंजार खेळी केली. मात्र त्याला दुसऱ्या बाजूने साथ मिळाली नाही. तसेच कहर म्हणजे ऑलराउंडर शिवम दुबे याला आठव्या स्थानी बॅटिंगसाठी यावं लागलं. शिवमने 1 धाव करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला.

टीम इंडियासाठी वर्ल्ड कपआधी चिंतेचा विषय

टीम इंडियाला आगामी टी 20i वर्ल्ड कपआधी 8 सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. मात्र असं असतानाही जर भारताचा कोणता फलंदाज कोणत्या स्थानी खेळणार? हे निश्चित नसेल तर हा टीम इंडियासाठी चिंतेचा विषय आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.