swt121.jpg
10200
चौकुळः येथील निराधार महिलेच्या घरात अर्चना चव्हाण यांचा पुढाकारामुळे वीज पोहचली आहे.
निराधारांचे घर झाले ‘प्रकाशमय’
वीज मीटर बसविलाः आशासेविका अर्चना चव्हाण यांचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १२ः चौकुळ ग्रामपंचायतीतील कार्यरत आशासेविका अर्चना अरुण चव्हाण यांनी आपल्या सामाजिक बांधिलकीतून दोन निराधार महिलांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने प्रकाशाचा दिवा प्रज्वलित केला आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे अनेक वर्षांपासून अंधारात दिवस काढणाऱ्या श्रीमती लक्ष्मी विष्णू गावडे व श्रीमती रुक्मिणी आप्पा गावडे यांच्या घरात अखेर वीज पोहोचली आहे.
आपल्या कार्यक्षेत्रात सदैव निष्ठेने आणि मनापासून काम करणाऱ्या आशासेविका चव्हाण यांच्या लक्षात आले की दोन महिलांच्या घरात आर्थिक अडचणींमुळे वीज मीटर बसवला गेलेला नाही. यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनावर मोठे संकट कोसळत होते. ही समस्या संबंधितांकडे अनेकदा मांडूनही समाधानकारक तोडगा न निघाल्याने आशाताईंची सतत खंत वाढत होती. शेवटी त्यांनी ही बाब चौकुळचे सरपंच गुलाबराव गावडे यांच्यासमोर मांडली आणि तातडीने मदत करण्याची विनंती केली. या संवेदनशील मागणीला सरपंचांनी त्वरित प्रतिसाद देत पुढाकार घेतला.
सरपंच आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने दोन्ही महिलांच्या घरात वीज मीटर बसवण्यात आले आणि त्यांच्या घरात अनेक वर्षांनंतर उजेड पसरला. या मदतीबद्दल आशासेविका चव्हाण यांनी सरपंच गावडे यांचे आभार मानले आहेत. तसेच, परिसरात अजून कोणतीही व्यक्ती विजेविना अडचणीत असेल, तर त्यांनी स्वतःशी किंवा ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा, असे त्यांनी आवाहन केले आहे. अर्चना चव्हाण यांच्या या संवेदनशील आणि कर्तव्यनिष्ठ कार्याचे पंचक्रोशीतून कौतुक होत असून, त्यांनी वीजपुरवठा करून केवळ घर उजळले नाही, तर गरिबांच्या जीवनात एक नवी उमेदही पेटवली आहे.