निवडणुकीमुळे थकीत कर वसुलीला चालना
esakal December 13, 2025 12:45 PM

निवडणुकीमुळे करवसुलीला चालना
चिपळूण पालिका ; साडेपाच लाखांची वसुली
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १२ ः नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अनेकांनी अर्ज भरले होते. त्यामुळे कागदपत्रे तयार करण्यासाठी थकीत कर भरण्यापासून विविध दाखल्यांचे शुल्क भरावे लागल्याने पालिकेच्या तिजोरीत सुमारे सहा लाखांची भर पडली आहे.
निवडणूक जाहीर होताच अनेक इच्छुकांनी अर्ज भरले. नगराध्यक्षपदासाठी १३, तर नगरसेवकांच्या २८ जागांसाठीही तब्बल १४१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते; मात्र कोणतीही निवडणूक लढवायची असल्यास त्यासाठी निवडणूक आयोगाने अनेक नियम व अटी घालून दिल्या आहेत. त्यामुळे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्यांनी नियम व अटींची पूर्तता करताना अनेकांनी आपला थकीत कर भरला. यातून ५ लाख ५० हजार रुपये जमा झाले. तसेच दुसऱ्या अटींची पूर्तता करताना शेकडोजणांनी पालिकेचा कर थकीत नसल्याचा, आपल्याकडे नियमानुसार शौचालय असल्याचा, ठेकेदार नसल्याचा असे अनेक प्रकारचे दाखले घेतले. हे दाखले मिळवण्यासाठीही मोठी गर्दी झाली होती. दिवसाला अनेक अर्ज पालिकेत येत होते. मागणीनुसार दाखले देण्यासाठी मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. या दाखल्यांसाठीही पालिकेच्या नियमानुसार त्याचे शुल्क संबंधितांकडून घेतले. यातूनही हजारो रुपये नगर पालिकेच्या तिजोरीत पडले आहेत. त्यामुळे यावर्षी वसुलीचा टक्का वाढणार आहे. कोणतेही वसुलीपथक न पाठवता कर भरण्यात आल्याने निवडणूक फॉर्म्युला उपयोगी पडल्याचे बोलले जात आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.