पुणे - फुरसुंगी-उरुळी देवाची कचरा डेपोतील कचऱ्याचे जैविक उत्खनन (बायोमायनिंग) करून त्याची विल्हेवाट लावण्याच्या निविदेत प्रतिटन ५५० रुपये नीचांकी दर एका कंपनीने दिला आहे. त्यामुळे उर्वरित चार निविदांमध्येही याच दराने ठेकेदारांना काम करावे लागणार आहे.
या निविदेत झालेल्या स्पर्धेमुळे गेल्या वर्षीच्या दराचा विचार केल्यास पाच पॅकेजमध्ये १२० कोटींची बचत होणार आहे. दरम्यान, बायोमायनिंगच्या निविदेत ठेकेदारांमध्ये स्पर्धा व्हावी आणि निविदेचा दर कमी व्हावा, याबाबत ‘सकाळ’ने वारंवार पाठपुरावा केला. त्या भूमिकेला यश मिळल्याचे यातून स्पष्ट होत आहे.
फुरसुंगी कचरा डेपोत २८ लाख टन कचरा पडून आहे. त्याचे बायोमायनिंग करून तेथील जागा २०२७ पर्यंत रिकामी करायची आहे. त्यासाठी महापालिकेने ५.६० लाख मेट्रिक टनाच्या पाच निविदा काढून एकाच वेळी २८ लाख टन कचऱ्याचे बायोमायनिंग करण्याचा निर्णय घेतला.
त्यासाठी केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या (महुआ) नियमावलीनुसार निविदा प्रक्रिया राबविली होती. या पाच पॅकेजसाठी १७ ठेकेदारांनी निविदा भरली होती. त्यातील आठ जण पात्र ठरले होते. या ठेकेदारांनी आर्थिकविषयक माहिती दिलेले ‘ब’ पाकिट शुक्रवारी उघडण्यात आले.
त्यात पॅकेज दोनमध्ये अल्फा थर्म लिमिटेड कंपनीने सर्वांत कमी ५५० रुपये प्रति टन दराने काम करण्याची तयारी दाखवली आहे; तर पॅकेज एक, पॅकेज तीन, पॅकेज चार आणि पॅकेज पाचमध्ये दया चरण अँड कंपनी या एकाच कंपनीने प्रति टन ७१७ रुपयांमध्ये काम करण्याची तयारी दाखवली आहे.
महापालिकेच्या निविदेतील अटी-शर्तींनुसार पाचही पॅकेजमध्ये जो सर्वांत कमी दर आहे, त्याच दराने इतर ठेकेदारांनी काम करणे अनिवार्य असेल, अशी अट टाकलेली होती. त्यामुळे उर्वरित पॅकेजमध्ये ठेकेदारांना ५५० रुपये प्रतिटन दराने काम करावे लागणार आहे. त्यात ठेकेदारांनी नकार दर्शविल्यास अन्य पात्र ठेकेदारांकडे याबाबत विचारणा केली जाणार आहे.
गेल्यावर्षी होता ९७९ रुपयांचा दर :
गेल्यावर्षी २०२४ मध्ये महापालिकेने १० लाख मेट्रिक टन कचऱ्याचे बायोमायनिंग करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली होती. त्यात भूमीग्रीन कंपनीने तब्बल ९७९ रुपये प्रतिटन दर दिला होता. त्यानुसार ९७ कोटी रुपये १० लाख टन कचऱ्यासाठी खर्च झाला आहे. आता २०२५ मध्ये २८ लाख टन कचऱ्याचे बायोमायनिंग करण्यासाठी पाच निविदा काढल्या आहेत.
त्यासाठी ५५० रुपये प्रतिटनाप्रमाणे काम केल्यास एकूण खर्च १५४ कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. गेल्यावर्षीच्या ९७९ रुपये प्रति टन याच्याशी ५५० रुपये प्रतिटन याची तुलना केल्यास २८ लाख टन कचऱ्याचे बायोमायनिंग करण्यासाठीचा खर्च तब्बल १२० कोटी रुपयांनी कमी होणार आहे, हे महापालिकेचे मोठे यश आहे.
‘पाच पॅकेजमध्ये ५५० रुपये प्रति टन प्रक्रिया शुल्क आले आहे, जो सर्वांत कमी दर आला आहे. त्याच दराने सर्व पॅकेजमध्ये काम केले जाईल, अशी अट निविदेत टाकली होती. त्यामुळे अन्य ठेकेदारांना याच दराने काम करावे लागणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया सुरू केली आहे.’
- पवनीत कौर, अतिरिक्त आयुक्त, महापालिका
बायोमायनिंगच्या निविदेत महापालिकेने पारदर्शकपणे निविदा प्रक्रिया राबवली असून, निविदेत मोठी स्पर्धा झाली आहे. त्यामुळे महापालिकेचा फायदा झाला आहे.
- नवलकिशोर राम, आयुक्त, महापालिका