2026 मध्ये शेअर बाजार किती दिवस बंद राहणार? नॅशनल स्टॉक एक्सचेंजकडून सुट्ट्यांची यादी जाहीर
Marathi December 13, 2025 10:25 PM

शेअर बाजार सुट्ट्या 2026 मुंबई : सध्या 2025 मधील शेवटचा महिना डिसेंबर सुरु आहे. हा महिना संपल्यानंतर जानेवारीपासून 2026 ची सुरुवात होणार आहे. भारतीय शेअर बाजार शनिवार आणि रविवार सोडून  कोणत्या दिवशी बंद राहणार याची माहिती नॅशनल स्टॉक एक्सचेंजकडून देण्यात आली आहे. 2026 मध्ये शनिवार आणि रविवार शिवाय शेअर बाजार 15 दिवस बंद राहील.

Share Market Holidays : शेअर बाजाराला 2026 किती दिवस सुट्टी?

भारतीय बाजारात शनिवार आणि रविवारी ट्रेडिंग होत नाही. याशिवाय एनएसईनं जारी केलेल्या सुट्ट्यांच्या दिवशी देखील ट्रेडिंग बंद राहील. नॅशनल स्टॉक एक्सचेंजनं 2026 मधील एकूण 15 दिवसांच्या सुट्ट्या जाहीर केल्या आहेत.

एनएसईनं जारी केलेली सुट्ट्यांची यादी

नॅशनल स्टॉक एक्सचेंजनं जारी केलेल्या कॅलेंडरनुसार जानेवारी ते मार्च दरम्यान शेअर बाजार चार दिवस बंद असेल. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिवस, 3 मार्चला होळी, 26 मार्चला रामनवमी, 31 मार्चला महावीर जयंती निमित्त शेअर बाजाराला सुट्टी असेल. या दिवशी ट्रेडिंग बंद असेल.

एप्रिल 2026 पासून नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात होईल. 3 एप्रिलला गुड फ्रायडे निमित्त शेअर बाजार बंद असेल. 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, 1 मे रोजी महाराष्ट्र दिवस आणि कामगार दिन, 28 मे रोजी बकरी ईद निमित्तानं शेअर बाजाराला सुट्टी असेल. 26 जूनला मोहरम निमित्त शेअर बाजार बंद असेल.

14 सप्टेंबरला गणेश चतुर्थी,2 ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंती, 20 ऑक्टोबरला दसरा आणि 10 नोव्हेंबरला दिवाळी, बलिप्रतिपदेनिमित्त बाजार बंद असेल. 24 नोव्हेंबरला प्रकाश पर्व गुरु नानक देव यानिमित्तानं शेअर बाजाराला सुट्टी असेल. तर, 25 डिसेंबरला ख्रिसमसनिमित्त नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर ट्रेडिंग होणार नाही. 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिन शनिवारी आला आहे. शनिवारी आणि रविवारी ट्रेडिंग होणार नाही.

दिवाळीनिमित्त मुहूर्त ट्रेडिंग कधी असणार?

नॅशनल स्टॉक एक्सचेंजनं दिवाळीनिमित्त मुहूर्त ट्रेडिंग रविवारी 8 नोव्हेंबर 2026 ला होणार असल्याचं जाहीर केलं आहे. ट्रेडिंगची वेळ जाहीर करण्यात आली नाही. याबाबत नंतर माहिती दिली जाईल.

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.