छत्रपती संभाजीनगर : राजस्थानातून मुलगी पाहण्यासाठी आलेल्या तरुणाला छत्रपती संभाजीनगरात टोळीने फिल्मी स्टाइलने फसवले. विधिपूर्वक घरातच लग्न लावून दिले. त्यासाठी १ लाख ३० हजार रुपये घेतले.
नवरी सासरी निघाली. सोबत तिची मैत्रीणही होती. पण, मनमाडला पोचताच नववधूसह तिची मैत्रीण रेल्वे स्टेशनवरून गायब झाली. त्यामुळे विवाहेच्छुकाला ‘हळद’ लावून ‘चुना’ लावल्याचा प्रकार समोर आला.
दिलीपकुमार देवरामजी सेन (वय ३०, रा. सिरोई, पिनवाडा, राजस्थान) हा सलून व्यवसाय करतो. त्याच्या पत्नीचे कोरोनाकाळात निधन झाले. त्याच्या लग्नासाठी मोठा भाऊ नरेश हा मुलगी बघत होता. छत्रपती संभाजीनगरातील फिरोज आणि सलीम हे दोघे त्याच्या ओळखीचे होते. त्या दोघांसोबतच ७ डिसेंबरला नरेशने फिरोजला फोन कॉल करून लग्नाची बोलणी केली. या दोघांनी ‘आमच्याकडे मुलगी आहे’ असे सांगत दिलीपकुमारला मुलगी पाहण्यासाठी शहरात घेऊन या असे सांगितले.
त्यानंतर सलीम आणि फिरोजने दिलीपकुमारच्या कुटुंबीयांसोबत शहरातील नजमा खान या मध्यस्थ महिलेशी बोलणे करून दिले. तिनेही आमच्याकडे मुलगी आहे, असे सांगत दिलीपकुमारच्या व्हॉट्ॲपवर मुलीचा फोटो पाठवला. दिलीपकुमार, त्याचा भाऊ नरेश आणि आई असे तिघेजण आठ डिसेंबरला शहरात आले. या तिघांना नजमासह तिच्या साथीदारांनी एन-१३, सी सेक्टर भारतनगर, वानखेडेनगर येथील एका घरी नेले. तिथे २५ वर्षीय तरुणी दाखवली. तिचे नाव आदिती विठ्ठल जगप्रताप असे सांगितले.
दोघांनी एकमेकांना पसंती दिली. त्यानंतर दिलीपकुमारचे कुटुंबीय ते मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये आले. तिथे नजमाला एक लाख ३० हजार रुपये दिले. नंतर नजमा हिने पुन्हा सेन कुटुंबीयांना मुलीच्या घरी नेले. तिथे आदिती आणि दिलीपकुमार यांचे साध्या पद्धतीने लग्न लावण्यात आले. नंतर आदितीची राजस्थानाला पाठवणी झाली. सोबत तिची पाठराखीण चंदा नावाची मैत्रीण निघाली.
आदिती आणि चंदा यांना स्टेशनजवळील एका हॉटेलमध्ये जेऊ घातले. जेवणानंतर नजमाने दिलीपकुमारकडे राहिलेल्या पैशांची मागणी केली. पण, त्याने पैसे नसल्याचे सांगताच ती निघून गेली. नंतर सेन कुटुंब आदिती, चंदासह खासगी बसने पंचवटीला गेले. तिथून सर्वजण ८ डिसेंबरला रात्री ११ वाजता मनमाड रेल्वेस्थानकावर पोचले. दिलीपकुमार हा तिकीट काढण्यासाठी गेला असता आदिती आणि चंदा या दोघींनी आज मुक्काम करू, उद्या सकाळी जाऊ म्हणाल्या. त्यानंतर दिलीपकुमारने रूम बुक केली आणि तो जेवणाची सोय करण्यासाठी गेला असता या संधीचा फायदा घेत रात्री बारा वाजता दोघी पळून गेल्या.
Latest Marathi Breaking News Live : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर शहरात येऊन तक्रारसेन कुटुंबीयांनी मनमाडमध्ये त्या दोघींचा शोध घेतला. पण, त्या सापडल्या नाहीत. नजमा खान आणि तिच्या साथीदारांना वारंवार फोन केले. परंतु, कुणीच फोन उचलला नाही. दरम्यान, फसवणूक झाल्याचे कळल्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजीनगर गाठत वेदांतनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. नजमासह तिच्या साथीदारांविरोधात गुन्हा नोंद झाला. पोलिस निरीक्षक प्रवीणा यादव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नामदेव सुपे तपास करीत आहेत.