अर्जेंटिनाचा स्टार आणि दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने मुंबईतील ऐतिहासिक अशा वानखेडे स्टेडियमवर हजेरी लावली. मेस्सीचं फुटबॉल चाहत्यांनी आणि मुंबईकरांनी स्टेडियममध्ये जल्लोषात स्वागत केलं. चाहत्यांनी “मेस्सी मेस्सी” असा जयघोष केला. मेस्सीनेही चाहत्यांचं अभिवादन स्वीकारलं. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेस्सीला स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित केलं. तसेच यावेळेस मेस्सीच्या हस्ते राज्य सरकारच्या ‘प्रोजेक्ट महादेवा’चं उद्घाटन करण्यात आलं. यावेळेस मेस्सीसोबत मुख्यमंत्री उपस्थित होते. राज्य सरकारच्या ‘प्रोजेक्ट महादेवा’अंतर्गत 13 वर्षांखालील 60 खेळाडूंना फुटबॉलचे धडे दिले जाणार आहेत.
‘प्रोजेक्ट महादेवा‘चं उद्घाटन करण्यात आल्यानंतर क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याला मैदानात बोलावण्यात आलं. सचिनने मेस्सीसोबत संवाद साधला. तसेच सचिनने या दरम्यान स्टेडियममधील उपस्थितीत चाहत्यांना आणि मुंबईकरांना मराठीत संबोधित केलं. सचिनने या दरम्यान मेस्सीच्या केलेल्या स्वागतासाठी चाहत्यांचे आभार मानले. तसेच सचिनने वानखेडेवरील आपल्या स्मृतींना उजाळा दिला.
मेस्सी आणि सचिन हे दिग्गज एकत्र आल्यानंतर दोघांनी एकमेकांना मिठी मारली. सचिनने त्याची 10 नंबरची ऑटोग्राफ असलेली जर्सी मेस्सीला भेट दिली. तर मेस्सीने सचिनला फुटबॉल दिला. दोघांनी एकमेकांसह संवाद साधला. त्यानंतर सचिनने उपस्थित चाहत्यांसह मराठीत काय संवाद साधला? हे जाणून घेऊयात.
सचिनचं चाहत्यांसोबत मराठीत संबोधन
सचिनने मेस्सीसमोर चाहत्यांना मराठीत संबोधित करुन मनं जिंकली. सचिनने काही मिनिटं मराठीत संबोधित केलं. त्यानंतर सचिनने इंग्रजीत बोलण्यास सुरुवात केली. “नमस्कार मुंबई, काय कसं काय? सर्वप्रथम माझ्या वतीने सर्वांना धन्यवाद. सचिनने अशाप्रकारे उपस्थितांची आस्थेवाईक विचारपूस करत जाहीर आभार मानले.
“आपण मुंबईत आहोत. तुम्ही ज्यापद्धतीने लिओ, लुईस आणि रॉड्रिग्संचं स्वागत केलं त्यासाठी धन्यवाद”, असं म्हणत सचिनने या तिघांच्या वतीने चाहत्यांचे आभार मानले. त्यानंतर सचिनने इंग्रजीत सुरुवात केली. सचिनचा मराठीत केलेल्या भाषणाचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
“मी इथे (वानखेडे स्टेडियममध्ये) अनेक क्षण अनुभवलेत. आपण मुंबईला स्वप्न नगरी म्हणतो. याच मैदानात अनेक स्वप्न पूर्ण झाली आहेत”, असं सचिनने म्हटलं. तसेच सचिनने 2011 च्या वर्ल्ड कप विजयाच्या आठवणींना उजाळा दिला. टीम इंडियाने याच वानखेडे स्टेडियममध्ये श्रीलंकेला पराभूत करत 1993 नंतर वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. “या मैदानावर 2011 साली तुमच्या पाठिंब्याशिवाय सुवर्णक्षण अनुभवता आला नसता”, असं संबोधन करत सचिन पुन्हा एकदा वर्ल्ड कप विजयाच्या आठवणीत रमलेला दिसला.