आयपीएल मिनी लिलावाची जोरदार तयारी झाली आहे. अवघ्या काही तासात खेळाडूंवर बोली लागणार आहे. कोणता खेळाडूला सर्वाधिक भाव मिळणार याची उत्सुकता आहे. तसेच अनकॅप्ड प्लेयर्समध्ये कोण भाव खाऊन जाणार याकडेही लक्ष लागून आहे. यात भारताच्या पाच खेळाडूंकडे लक्ष असणार आहे. हे खेळाडू फारसे प्रसिद्धीच्या झोतात आलेले नाहीत. या खेळाडूंमध्ये एक खेळाडू 150 किमी/तासापेक्षा अधिक वेगाने गोलंदाजी करण्याची ताकद ठेवतो. तर दोन फलंदाजांच्या कौशल्याची स्तुती आरसीबी आणि केकेआरने केली आहे. त्यामुळे पाच खेळाडूंवर पैशांचा वर्षाव होण्याची शक्यता अधिक आहे. चला जाणून घेऊयात आयपीएलमध्ये भाव खाणारे पाच खेळाडू कोण ठरू शकतात?
करण लाल : बंगालच्या 25 वर्षीय खेळाडूची जोरदार चर्चा आहे. त्याला आयपीएल 2026 मिनी लिलावात चांगली रक्कम मिळू शकते. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी त्याने आपल्या फलंदाजीची कसब दाखवली आहे. त्याने 50 चेंडूत 113 धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याने आरसीबी ट्रायल्समध्ये भाग घेतला. तेव्हा त्याने 17 चेंडूत 54 धावा केल्या. इतकंच काय तर सुयश शर्माच्या गोलंदाजीवर दोन षटकार मारले. तर नवदीप सैनीच्या गोलंदाजीवर तीन षटकार मारले.
कार्तिक शर्मा : राजस्थानच्या विकेटकीपर फलंदाज कार्तिक शर्मावरही फ्रेंचायझींची नजर आहे. एक तर विकेटकीपर आणि त्यातही फिनिशरची भूमिका बजावतो. त्यामुळे त्याच्यावर काही फ्रेंचायझींचा डोळा आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतील पाच डावात त्याने 160 पेक्षा जास्तीच्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. त्याच्या खेळीचं कौतुक आर अश्विन आणि आकाश चोप्रा यांनी केलं आहे.
अशोक शर्मा : टी20 क्रिकेट म्हंटलं तर गोलंदाजांची दाणादाण उडते. अशा स्थितीत एका गोलंदाजाची नेहमीच गरज असते. राजस्थानचा अशोक शर्मा ही गरज भागवू शकतो. त्याने मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत 20 विकेट घेतल्या आहेत. त्यात त्याने 150 किमी तास वेग गाठू शकतो हे दाखवून दिलं आहे. त्याचा वेग लखनौ आणि चेन्नई सुपर किंग्स संघासाठी महत्त्वाचा ठरू शकतो.
तुषार रहेजा : तामिळनाडूचा तुषार विकेटकीपर फलंदाज आहे. त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतील सात सामन्यात 151 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट 164.13 चा आहे. दिल्ली कॅपिटल्ससारख्या संघाला चांगली ओपनिंग करून देऊ शकतो.
आकिब नबी : जम्मू काश्मिरच्या या गोलंदाजाने रणजी ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत जबरदस्त कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याच्यासाठी फ्रेंचायझी फिल्डिंग लावून असतील यात काही शंका नाही. इतकंच काय तर नबी लवकरच टीम इंडियात दिसून शकतो.