IND vs SA : चौथ्या टी20 सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, स्टार अष्टपैलू खेळाडू मालिकेतून आऊट
GH News December 16, 2025 12:10 AM

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील तीन सामन्यांचा खेळ पार पडला असून 2-1 ने टीम इंडिया आघाडीवर आहे. त्यामुळे चौथा टी20 सामन्यात भारताला मालिका विजयाची संधी आहे. पण या सामन्यापू्र्वीच टीम इंडियाला धक्का बसला आहे. कारण स्टार अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल उर्वरित दोन सामन्यांना मुकला आहे. अक्षर पटेल लखनौ आणि अहमदाबाद टी20 सामन्यात खेळणार नाही. तसेच त्याच्या बदली खेळणाऱ्या खेळाडूची घोषणाही केली आहे. निवड समितीने बंगालचा फिरकीपटू शाहबाज अहमद याचा संघात समावेश केला आहे. शाहबाज उर्वरित दोन सामन्यात अक्षर पटेलची जागा घेईल. बीसीसीआयने प्रेस रिलीज जाहीर करत अक्षर पटेलबाबत ही माहिती दिली आहे.

अक्षर पटेलला नेमकं काय झालं?

तिसरा टी20 सामना पार पडल्यानंतर अक्षर पटेल आजारी पडला. चौथ्या सामन्यापूर्वी बरा होईल अशी अपेक्षा होती. मात्र अजूनही बरा झालेला नाही. अक्षर पटेल सध्या लखनौमध्ये संघासोबत आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून त्याची तपासणी केली जात आहे.त्यामुळे ऐनवेळी संघात बदल करण्यात आला आहे. दुसरीकडे, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहही तिसऱ्या टी20 सामन्यात नव्हता. त्याला अचानक घरी जावं लागलं होतं. पण शेवटच्या दोन सामन्यासाठी त्याचं संघात नाव आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराह शेवटच्या दोन सामन्यात खेळणार हे स्पष्ट झालं आहे. लवकरच तो संघासोबत खेळताना दिसेल. 17 डिसेंबर रोजी लखनौमध्ये आणि 19 डिसेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये शेवटचे दोन सामने होतील.

“टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल आजारपणामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उर्वरित दोन आयडीएफसी फर्स्ट बँक टी20 सामन्यांमधून बाहेर पडला आहे,” असे बीसीसीआयने प्रेस रिलीजमध्ये स्पष्ट केलं आहे.

शेवटच्या दोन सामन्यांसाठी टीम इंडिया

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सैमसन (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, हर्षित राणा, वॉशिंगटन सुंदर, शाहबाज अहमद.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.