दुबार मतदारांचा मुद्दा न्यायालयात २२ डिसेंबरला सुनावणी
esakal December 17, 2025 07:45 AM

दुबार मतदारांचा मुद्दा थेट न्यायालयात
वसई-विरारमध्ये पालिकेच्या प्रारूप यादीत ५० हजारांहून अधिक नावे दुबार; २२ डिसेंबरला सुनावणी
विरार, ता. १६ (बातमीदार) ः वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीतील दुबार मतदारांच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. वसई-विरार पालिकेच्या ११ लाख २७ हजार ६४० मतदारांच्या यादीत सुमारे ५२ हजार ३७८ मतदारांची नावे दुबार असल्याचे समोर आले आहे. याविरोधात पालिकेतील सत्तारूढ बहुजन विकास आघाडीने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला असून, या प्रकरणाची सुनावणी आता सोमवारी (ता. २२) होणार आहे.
पालिकेने १ जुलैपर्यंतची विधानसभा मतदार यादी गृहीत धरून प्रारूप यादी जाहीर केली आहे. राजकीय पक्षांनी प्रभागनिहाय याद्यांची पडताळणी केली असता, यामध्ये मोठ्या प्रमाणात दुबार नावे आढळली आहेत. बहुजन विकास आघाडीने तर ८० हजार नावे दुबार असल्याचा आक्षेप नोंदवत, ती नावे सरसकट रद्द करण्याची मागणी केली होती. पालिका निवडणुकीच्या तोंडावर हा पेच निर्माण झाल्यामुळे, निवडणूक आयोगाने दुबार नावे असलेल्या मतदारांना कुठल्याही एका मतदान केंद्रामध्ये मतदान करण्याची मुभा दिली आहे. त्यानुसार, वसई-विरार महापालिकेने ५० हजार दुबार मतदारांची यादी पालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करून, मतदारांना आपली नावे तपासून एका मतदान केंद्राची निवड करण्याचे आवाहन केले आहे.

बहुजन विकास आघाडीची याचिका दाखल
परंतु दुबार मतदारांच्या मुद्द्यावरून बहुजन विकास आघाडी आक्रमक झाली असून, प्रवक्ते अजीव पाटील यांनी याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याबाबतची सुनावणी सोमवारी होणार आहे. हमीपत्र भरून घेण्यापेक्षा ती नाव सरसकट रद्द करणे आवश्यक आहे. ज्या प्रभागात मतदाराचे नाव त्याच ठिकाणी त्याने मतदान करायला हवे. दुबार मतदारांना अशी मुभा दिली, तर गैरवापर होण्याची शक्यता असल्याचे अजीव पाटील यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.