मराठवाडा-कोकण आता ‘एक्स्प्रेस वे’ने जोडणार
लातूर-बदलापूर महामार्गाला मंजुरी!
बदलापूर, ता. १६ : मराठवाडा आणि कोकणाला थेट जोडणाऱ्या ४४२ किमी लांबीच्या ‘लातूर-बदलापूर’ या अतिजलद महामार्गाला राज्य सरकारने तत्त्वतः मंजुरी दिली आहे. सुमारे ३५ हजार कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प राज्याच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरणार असून, यामुळे लातूर ते मुंबई हा प्रवास केवळ ५ ते ५.१५ तासांत पूर्ण होणार आहे.
महामार्गाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे माळशेज घाट परिसरात प्रस्तावित असलेला आठ किलोमीटर लांबीचा बोगदा होय. या बोगद्यामुळे घाटमाथ्यावरील धोकादायक वळणे आणि वेळखाऊ प्रवास टळणार असून, पावसाळ्यात होणारी वाहतूक कोंडीही दूर होईल. आमदार किसन कथोरे यांनी कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या मार्गाची मागणी केली होती. फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार अभिमन्यु पवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर अधिवेशनात शिक्कामोर्तब करण्यात आले.
विकास आणि सुविधांचे जाळे
केवळ रस्ताच नाही, तर या महामार्गाच्या कडेला आधुनिक सुविधांचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे नव्या उद्योगांना चालना मिळणार आहे.
लॉजिस्टिक पार्क : मालवाहतूक आणि व्यापारासाठी सोयीचे ठरणार आहे.
पर्यटन आणि रोजगार : मराठवाडा आणि कोकणातील पर्यटनाला गती मिळून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये
एकूण लांबी : ४४२ किलोमीटर
अंदाजित खर्च : ३५,००० कोटी रुपये.
नवा मार्ग : लातूर-माळशेज-म्हसा-बोराडपाडा मार्गे बदलापूर
वेळेची बचत : सध्या लागणाऱ्या ८-९ तासांऐवजी हा प्रवास ५ तासांवर येईल.
हा महामार्ग बदलापूर आणि संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्राला मराठवाड्याशी जोडणारा विकासाचा महामार्ग ठरेल. शेतकरी, व्यापारी आणि उद्योजकांसाठी हा प्रकल्प नवी दिशा देणारा आहे.
-किसन कथोरे, आमदार