दीडशे वर्षांचे अस्तित्व धोक्यात
द्रोणागिरीच्या पायथ्याशी उत्खनन, आदिवासींवर विस्थापनाची वेळ
उरण, ता. १६ (वार्ताहर)ः करंजा-रेवस पुलाच्या बांधकामासाठी द्रोणागिरी पर्वताच्या पायथ्याशी उत्खनन सुरू आहे. या उत्खननामुळे परिसरातील आदिवासी समाजात भीतीचे वातावरण असून दीडशे वर्षांपासून पिढ्यानपिढ्या वास्तव्यास असलेल्या आदिवासींच्या अस्तित्वावर गदा आली आहे.
करंजा-रेवस पुलाची उभारणी केली जात आहे. यासाठी द्रोणागिरी पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या मातीचा वापर भरावासाठी केला जात आहे; पण हे उत्खनन वर्षानुवर्षे येथे राहणाऱ्या आदिवासी समाजाला कोणतीही पूर्वसूचना किंवा सामाजिक सुनावणीशिवाय सुरू आहे. या उत्खननाने डोंगर उतारावरील आदिवासी घरांना तडे जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच भूस्खलनाने थेट जीवितहानीची भीती आहे. घरांजवळील स्फोटक यंत्रणा अवजड यंत्रसामग्री आणि खोल उत्खनन सुरू असल्याने लहान मुले, महिला आणि वृद्धांचे प्राण धोक्यात आले आहेत.
---------------------
नियमांची पायमल्ली
- द्रोणागिरी पर्वत भौगोलिक भाग नसून पौराणिक, धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचा परिसर आहे. अशा संवेदनशील ठिकाणी पर्यावरणीय अभ्यास, सामाजिक परिणाम अहवाल आणि आदिवासींची लेखी संमतीशिवाय नियमांची थेट पायमल्लीचा आरोप होत आहे.
- आदिवासी कायदे, वनहक्क कायदा आणि संविधानातील तरतुदी डावलून विकासाच्या नावाखाली आदिवासींच्या जगण्यावर गदा आणली जात आहे. त्यामुळे तत्काळ उत्खनन थांबवावे, स्थानिक आदिवासींना विश्वासात घेऊन पुनर्वसनाची स्पष्ट योजना मांडावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.
-----------------------
चालू असलेले काम आम्ही बंद केले आहे. त्या कंपनीकडून संपादन झाल्यास कागदपत्रांची तपासणी केली जात आहे.
- उद्धव कदम, तहसीलदार, उरण
-----------------------
कोणतेही काम करताना भू-संपादनाची प्रक्रिया होणे गरजेचे आहे. आमच्या कार्यालयातून कोणतीही भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.
- ए. एम. सोनावणे, उपजिल्हाधिकारी, उरण