मुंबईकरांच्या आरोग्यसेवांसाठी ‘बीएमसी हेल्थ चॅटबॉट’
डिजिटल आरोग्य व्यवस्थेकडे महापालिकेची वाटचाल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : सार्वजनिक आरोग्यसेवांमध्ये तंत्रज्ञानाचा अधिकाधिक प्रभावी वापर करण्याच्या दिशेने मुंबई महापालिकेने आणखी एक पाऊल टाकले आहे. नागरिकांच्या आरोग्य सुविधांसाठी ‘बीएमसी हेल्थ चॅटबॉट’ ही डिजिटल सेवा सुरू करण्यात आली आहे. डिजिटल हेल्थ सोल्युशन्सच्या माध्यमातून आरोग्य सेवांची पोहच, कार्यक्षमता आणि पारदर्शकता वाढवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. आरोग्यविषयक माहिती एका केंद्रित डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या सेवेचे लोकार्पण राज्याचे माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशीष शेलार यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. नागरिकांसाठी ९८९२९९३३६८ हा क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला असून, या माध्यमातून आरोग्यसेवांशी संबंधित माहिती डिजिटल पद्धतीने प्राप्त करता येणार आहे. तंत्रज्ञानाधारित या आरोग्यसेवांमुळे नागरिकांचा वेळ, खर्च आणि श्रम वाचून सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत डेटा-आधारित, पारदर्शक आणि नागरिककेंद्री बदल घडून येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
वैज्ञानिक व प्रणालीबद्ध माहितीचा डिजिटल प्रवेश
‘बीएमसी हेल्थ चॅटबॉट’च्या माध्यमातून नागरिकांना आजार प्रतिबंध, जनजागृती मोहिमा, नजीकच्या आरोग्य सुविधा, उपचार केंद्रांची माहिती तसेच आरोग्यसेवांशी संबंधित नोंदणी प्रक्रियेबाबत तत्काळ आणि संरचित माहिती मिळणार आहे. डिजिटल संवाद प्रणालीमुळे माहिती मिळवण्याचा वेळ कमी होऊन निर्णय प्रक्रिया अधिक वेगवान होण्यास मदत होणार आहे.
आरोग्यसेवा व्यवस्थेतील कार्यक्षमतेत वाढ
या चॅटबॉटद्वारे आरोग्य केंद्रातील भेटीसाठी ऑनलाइन नोंदणी, आरोग्य प्रमाणपत्रे, विविध परवाने, तसेच नागरी सेवांशी संबंधित जन्म-मृत्यू दाखले, विवाह नोंदणी, अपंगत्व प्रमाणपत्र आणि प्रसूतिगृह परवाने याबाबतची माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे आरोग्य व्यवस्थेतील प्रशासकीय ताण कमी होऊन सेवा वितरण अधिक परिणामकारक होणार आहे.