तळेगाव दाभाडे, ता. १७ : वडगाव मावळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत कान्हे फाटा येथील गोल्डन ड्रीम आणि वडगाव मावळ येथील विश्वदीप या ऑर्केस्ट्रा बारच्या चालकांवर पोलिसांनी स्वतंत्र गुन्हे दाखल केले.
शासनाने दिलेल्या परवान्याच्या अटी व शर्तींचा भंग केल्याप्रकरणी ही कारवाई झाली.
पोलिसांनी प्राप्त माहितीच्या आधारे छापे टाकले. परवानगीपेक्षा जास्त महिला कलाकार ठेवणे, रंगमंचाच्या मोजमापांचे पालन न करणे असे नियमभंग आढळले. गोल्डन ड्रीम ऑर्केस्ट्रा बारचा व्यवस्थापक उदय चक्र साळीग्राम (वय ४९), चालक दिनेश कृष्णा शेट्टी (वय ४६) व कर्मचारी किरण के. सी. टी. (वय २७, तिघे रा. कान्हे फाटा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. विश्वदीप ऑर्केस्ट्रा बारचा चेतन शिवाजी कुंभार (वय ३४), संचालक मनीष सूर्यकुमार (वय ५२, दोघे रा. वडगाव मावळ) यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
महाराष्ट्र हॉटेल, उपाहारगृह व मद्यपानगृह (बार रूम) येथील अश्लील नृत्यावर प्रतिबंध व काम करणाऱ्या महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण अधिनियम २०१६ अंतर्गत कलम ८ (१) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिस अधीक्षक व अपर पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव मावळ पोलिस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. याप्रकरणी पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख तपास करीत आहेत.
-----