खड्डे, मॅनहोलमुळे अपघात झाल्यास पालिका देणार भरपाई
esakal December 18, 2025 04:45 AM

खड्डे, मॅनहोलमुळे अपघात झाल्यास पालिका देणार भरपाई
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार विशेष समितीची स्थापना

ठाणे, ता. १७ : महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवरील खड्डे, उघडी गटारे किंवा रस्त्यांच्या देखभालीतील त्रुटींमुळे होणाऱ्या अपघातांसाठी आता महापालिका नुकसान भरपाई देणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, अशा अपघातांची शहानिशा करण्यासाठी आणि भरपाई निश्चित करण्यासाठी पालिकेने विशेष समिती स्थापन केली आहे.

अपघात घडल्यानंतर ४८ तासांच्या आत संबंधित नागरिक किंवा त्यांच्या नातेवाइकांनी समितीकडे तक्रार नोंदवणे आवश्यक आहे. केवळ खड्ड्यांमुळे झालेले अपघात किंवा उघड्या मॅनहोलमुळे झालेल्या दुखापती/मृत्यूचीच दखल घेतली जाईल. तसेच वाहनांच्या धडकेने होणारे अपघात यात ग्राह्य धरले जाणार नाहीत. समिती पोलिस ठाण्यातील तक्रार, पंचनामा आणि कागदपत्रांची पडताळणी करेल. तसेच, अपघात झालेला रस्ता महापालिकेच्या अखत्यारीत येतो का, याचीही तपासणी केली जाईल.

उच्चस्तरीय समितीची स्थापना
महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली या समितीची पहिली बैठक पार पडली. या समितीचे अध्यक्ष महापालिका आयुक्त सौरभ राव असतील. रविकांत पाझरकर (सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण), सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडीए आणि वाहतूक पोलिस विभागाचे अधिकारी यांचा समितीत सहभाग असेल.

नागरिकांना आवाहन
शहरात खड्डे किंवा उघड्या मॅनहोलमुळे अपघात झाल्यास नागरिकांनी त्वरित पुराव्यासह समितीकडे संपर्क साधावा, असे आवाहन पालिकेमार्फत करण्यात आले आहे. या निर्णयामुळे महापालिकेच्या रस्ते देखभाल विभागावर आता अधिक जबाबदारी येण्याची शक्यता आहे.

‘‘रस्त्यांच्या त्रुटींमुळे नागरिकांचा मृत्यू झाल्यास किंवा ते जखमी झाल्यास, नियमांनुसार आवश्यक ती भरपाई देण्याची कार्यवाही पालिका करेल. कागदपत्रांची योग्य पडताळणी करूनच ही भरपाई वितरित केली जाईल.’’
- सौरभ राव, आयुक्त, ठाणे महापालिका

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.