Eknath Shinde : महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीचे 'घोडे' ही फरार होतील; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा टोला!
esakal December 19, 2025 05:45 AM

डोंबिवली : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत महाविकास आघाडीचा टांगा पलटला असून येणाऱ्या महापालिका निवडणुकीत त्यांचे घोडेही फरार होतील, असा खोचक टोला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला. केडीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण पूर्वेतील दादासाहेब गायकवाड क्रीडांगणावर झालेल्या जाहीर पक्षप्रवेश सोहळ्यात त्यांनी विरोधकांवर निशाणा साधत निवडणूक प्रचाराची औपचारिक सुरुवात केली.

या सोहळ्यात काँग्रेसचे माजी नगरसेवक सचिन पोटे, काँग्रेसच्या माजी नगरसेविका जान्हवी पोटे, मनसेचे माजी नगरसेवक कस्तुरी देसाई, कौस्तुभ देसाई यांच्यासह काँग्रेस पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना एकनाथ शिंदे यांनी सचिन पोटे यांचे विशेष कौतुक करत ते लढवय्ये आणि प्रामाणिक कार्यकर्ते असल्याचे नमूद केले. ज्या ज्या ठिकाणी त्यांनी काम केले, तेथे त्यांनी जबाबदारीने आणि निष्ठेने काम केल्याचेही त्यांनी सांगितले.

काँग्रेसच्या सचिन पोटे यांचा एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश

विरोधकांच्या टीका आणि टोमण्यांवर भाष्य करताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील जनतेच्या विकासासाठी काम करत असताना कोण काय बोलत आहे याकडे आपण लक्ष देत नाही. आरोपांना आरोपातून नाही तर कामातून उत्तर दिले जाते आणि टीकेला टीकेतून नव्हे तर विकासकामांतूनच प्रत्युत्तर दिले जाते, असे त्यांनी स्पष्ट केले.

येणाऱ्या महापालिका निवडणुकीत महायुतीचीच सत्ता येणार हा ठाम विश्वास व्यक्त करताना एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची टीम दिवसेंदिवस अधिक मजबूत होत आहे. या टीममध्ये आधीच अनुभवी आणि ताकदवान खेळाडू आहेत आणि आता सचिन पोटे यांच्या प्रवेशामुळे संघाला आणखी बळ मिळाले आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत महायुतीच्या विजयाबाबत कोणताही संशय नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सर्वसामान्य नागरिकांना न्याय द्यायचा असेल आणि शहराचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर शिवसेनेशिवाय पर्याय नाही, असा ठाम दावा करत त्यांनी सांगितले की शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून येथे कोणी मालक नाही आणि कोणी नोकर नाही. सचिन पोटे यांचा पक्षात योग्य सन्मान केला जाईल आणि त्यांचा अनुभव व कार्यक्षमता पक्षवाढीसाठी आणि महापालिका निवडणुकीसाठी प्रभावीपणे वापरली जाईल, असे आश्वासनही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.