Malegaon Bus Accident : मालेगावजवळ शालेय सहलीच्या बसला भीषण अपघात; ७ विद्यार्थी जखमी, मोठा अनर्थ टळला!
esakal December 19, 2025 07:45 AM

मालेगाव: महामार्गावरील देवळा फाट्याजवळ उभ्या असलेल्या व रिप्लेक्टर नसलेल्या नादुरुस्त कंटनेरला पाठीमागून बसने धडक दिल्याने सात विद्यार्थी जखमी झाले. दहिगाव (ता. यावल) येथील आदर्श विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मुंबई येथे सहलीसाठी ही बस जात असताना रात्री दीडच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर दुसरी बस मालेगवाहून देण्यात आल्यानंतर सर्व जण मुंबईकडे मार्गस्थ झाले. या अपघातात बसच्या पुढील भागाचे जवळपास सत्तर हजारांचे नुकसान झाले.

मुंबई-आग्रा महामार्गावरील देवळा फाट्याजवळ रामदेवजीबाबा मंदिरासमोर कंटेनरचे (एनएल ०१ एजी ७२१३) टायर फुटल्याने तो रस्त्याच्या मध्येच उभा होता. या संदर्भात कंटेनरचालकाने महामार्ग विभागाला कल्पना दिल्यानंतरही महामार्गाचे कर्मचारी मदतीला आले नाहीत. त्याचवेळी दहिगाव (ता. यावल, जि. जळगाव) येथील आदर्श विद्यालयातील विद्यार्थ्यांची सहलीची बस (एमएच १४ एलएक्स ४८५१) मुंबईकडे निघाली होती. बसमध्ये ३९ विद्यार्थी, तीन शिक्षक, वाहक व चालक होते. बसचालक महामार्गाच्या दुभाजकाच्या बाजूने मुंबईकडे जात होते.

कंटेनरच्या पाठीमागे कुठल्याही प्रकारचे इंडिकेटर व गाडी बंद असल्याचे फलक लावले नव्हते. त्यामुळे रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या कंटेनरला ही बस पाठीमागून धडकली. सुदैवाने बसचालक मुरलीधर तुळशीराम पाटील (४७) यांनी ५० मीटरपर्यंत बसचे ब्रेक दाबत बसला नियंत्रणात आणल्याने मोठा अनर्थ टळला. यात सात विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. बस उजव्या बाजूला धडकल्याने बसची पुढील काच, डॅशबोर्ड यांसह ७० हजारांचे नुकसान झाले. जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना बसमध्ये असलेल्या उपचार पेटीने ड्रेसिंग करून मालेगाव आगारातील दुसरी बस आल्याने पुढे पाठविण्यात आले.

Srigonde Crime: 'माठ गावातील हातभट्टी अड्ड्यावर कारवाई'; पोलिसांकडून एक लाख १२ हजारांचा मुद्देमाल नष्ट..

ना रिफ्लेक्टर, ना फलक

टायर फुटलेला कंटेनर रस्त्याच्या मधोमध उभा राहिल्याने चालकाने महामार्ग विभागाच्या कर्मचाऱ्यांना सूचित केले होते. मात्र ते कुणीही मदतील आले नाहीत. तसेच कंटेनर चालकानेही कंटेनरचे दोन्ही दिवे सुरू ठेवणे गरजेचे होते. तसे न केल्याने तसेच कंटेनरवर रिफ्लेक्टरही नसल्याने मागून येणाऱ्या चालकाला कंटेनर दिसला नाही, तरीही त्याने प्रयत्न करीत जोराने बसचे ब्रेक लावल्याने मोठा अनर्थ टळला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.