अल्पसंख्याकांच्या विकासासाठी
शासन कटिबद्धः रविंद्र खेबुडकर
सिंधुदुर्गनगरीत ‘हक्क दिन’ साजरा
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १८ ः अल्पसंख्याक समाजाच्या समावेशक विकासासाठी शासन कटिबद्ध असून समाजातील प्रत्येक घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी केले.
अल्पसंख्याक समाजाच्या हक्कांचे संरक्षण, समानता व सामाजिक सलोखा याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने दरवर्षी १८ डिसेंबर हा ‘अल्पसंख्याक हक्क दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात श्री. खेबुडकर बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी वैशाली मळेकर, ॲड. अशफाक शेख, शहानवाज शहा, निसार शेख, ॲड. बापूशा अशिर अहमद पटेल, शेरपुद्दीन महंमद बोबडे, नितीन जठार, नामदेव मठकर, मुराद अली शेख, बुलंद पटेल, सलमान शेख, प्रकाश मोहिरे, रावजी यादव, फादर मॅन्युअल डिसिल्वा आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. बुधावले यांनी या दिनाचे महत्व सांगताना, भारत हा विविधतेने नटलेला देश असून ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही भावना आपल्या समाजाच्या केंद्रस्थानी आहे. कोणत्याही लोकशाही राष्ट्राची खरी ओळख ही त्या देशातील अल्पसंख्याक समाजाला मिळणाऱ्या सन्मान व सुरक्षिततेवर अवलंबून असते. या अनुषंगाने दरवर्षी अल्पसंख्याक हक्क दिन साजरा करण्यात येतो, असे सांगितले. तसेच त्यांनी अल्पसंख्याक समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या योजना आणि उपक्रमांविषयी सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली. यावेळी उपस्थित विविध समाज बांधवांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.