Epstein Files: एपस्टीन फाईल्सवरून अमेरिकेत नवीन तुफान, बिल गेट्स महिलांच्या गराड्यात, नवीन 68 फोटोंची दहशत
GH News December 19, 2025 12:11 PM

Epstein Files Bill Gates: मुली,महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी जेफ्री एप्सस्टीन याच्याकडील 68 नवीन फोटो समोर आले आहेत. अमेरिका हाऊस ऑफ रिप्रेंजेंटेटिव्हसच्या डेमोक्रेट्सने ही छायाचित्र सार्वजनिक केली आहे. यामध्ये एपस्टीनचे सामाजिक आणि आर्थिक वर्तुळ किती सशक्त होते हे समोर आलं आहे. हाऊस ओव्हरसाईट समितीने एपस्टीन याने 2019 मध्ये तुरुंगात आत्महत्या करण्यापूर्वीच ही छायाचित्र जप्त केली होती. त्याच्याकडून 95 हजार फोटो जप्त करण्यात आले आहेत. त्यातील अवघी काही फोटो समोर आली आहेत.

डेमोक्रेट्सने ही नवीन छायाचित्र समोर आणली आहेत. त्यात प्रभावशाली आणि श्रीमंत व्यक्ती दिसून येत आहेत. यामध्ये मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सहसंस्थापक बिल गेट्स, चित्रपट निर्माता वुडी एलन, गुगलचे सहसंस्थापक सर्गेई ब्रिन, फिलॉस्फर नोम चॉम्स्की आणि ट्रम्प यांचे माजी सल्लागार स्टीव्ह बॅनन यांचा समावेश आहे. नवीन छायाचित्रात दोन फोटोत बिल गेट्स हे महिलांसोबत दिसून आले आहेत.

न्यूयॉर्क टाईम्सचे म्हणणे काय?

याशिवाय न्यूयॉर्क टाईम्सचे स्तंभलेखक डेव्हिड ब्रुक्स हे सुद्धा एका फोटोत दिसून येत आहेत. त्यानंतर न्यूयॉर्क टाईम्सने स्पष्टीकरण दिले आहे. त्यात ब्रुक्सने 2011 मध्ये एक डिनर पार्टीत सहभाग घेतला असल्याचे सांगितले. स्तंभ लेखनासाठी आवश्यक माहिती गोळा करण्यासाठी तो तिथे उपस्थित असल्याचे म्हणणे न्यूयॉर्क टाईम्सने मांडले आहे. तर स्तंभलेखकाचा एपस्टीनशी कधीच संबंध आला नसल्याचे ही स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

चुकीचे काम केल्याचे संकेत नाही

डेमोक्रॅट्सने हे स्पष्ट केले आहे की या फोटोवरून या व्यक्तींनी काही चुकीचं काम केल्याचे कोणतेही संकेत मिळालेले नाही. समितीनुसार, या फोटोतून एपस्टीनचे सामाजिक आणि राजकीय वर्तुळ स्पष्ट होते. पण यातील प्रत्येक व्यक्ती त्याच्या गुन्ह्यात सहभागी असतील असं म्हणता येत नाही. पण हे फोटो त्याचे वलय मात्र दाखवतात.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वाक्षरीनंतर ही फोटो आणि इतर कागदपत्रं ज्याला एपस्टीन फाईल्स असं म्हणतात ती सार्वजनिक करण्याचा मार्ग मोकळा झाला. आज यासंदर्भातील महत्त्वाची माहिती समोर येणार आहे. अमेरिकाच नाही तर जगभरात या एपस्टीन फाईल्सची चर्चा आणि उत्सुकता लागलेली आहे. 19 नोव्हेंबर 2025 रोजी या विधेयकाला त्यांनी मंजुरी दिली होती. तर येत्या 30 दिवसात छायाचित्र आणि फाईल्स सार्वजनिक करण्याची सक्ती होती. त्यामुळे आज या प्रकरणात मोठा स्फोट होण्याची शक्यता आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.