मतदानासाठी अंबरनाथ सज्ज
esakal December 19, 2025 10:45 AM

मतदानासाठी अंबरनाथ सज्ज
दोन लाख ५४ हजार मतदार पहिल्यांदाच करणार तीन वेळा मतदान; प्रशासकीय यंत्रणेची तयारी पूर्ण

अंबरनाथ, ता. १८ (वार्ताहर) : अंबरनाथ नगर परिषदेच्या इतिहासात प्रथमच नगराध्यक्षपदासह दोन नगरसेवकपदांसाठी पॅनेल पद्धतीने २९ प्रभागांत ५९ नगरसेवकपदासांठी मतदान होणार आहे. त्यामुळे दहा वर्षांनी होणाऱ्या या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणाऱ्या दोन लाख ५४ हजार ४७८ मतदार पहिल्यांदाच तीन वेळा मतदानाचे बटण दाबणार आहेत. ही निवडणूक सुरळीत पार पडावी, यासाठी २७६ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. तर एक हजार ६२१ अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. दरम्यान, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी संवेदनशील प्रभागांसह सर्व शहरांमध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार आहे.

अंबरनाथ सार्वत्रिक निवडणूक २०२५ पुढे ढकलल्यानंतर आता २० डिसेंबरला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी शासकीय यंत्रणा पूर्णतः सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद शर्मा यांनी दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजल्यापासून मतदान साहित्याचे वाटप महात्मा गांधी विद्यालय येथून सुरू होणार आहे. एकूण २७६ मतदान केंद्रांसाठी १,६२१ अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून त्यांना १५४ वाहनांद्वारे त्यांच्या-त्यांच्या मतदान केंद्रावर रवाना करण्यात येणार आहे.

कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रत्येक मतदान केंद्रावर एक पोलिस कर्मचारी तैनात करण्यात येणार असून अशा प्रकारे २७६ पोलिस कर्मचारी नियुक्त असतील. याशिवाय अतिरिक्त पोलिस बंदोबस्त आणि सुमारे २६० होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. पोलिस विभागाने एकूण ३१ मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित केली आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी किंवा कायदा-सुव्यवस्थेची संभाव्य अडचण लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रचाराचा कालावधी १९ डिसेंबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ठेवण्यात आला आहे. प्रचार संपल्यानंतर पूर्ण शांतता पाळली जाणार असून मतदानाच्या दिवशी कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. मतमोजणी प्रक्रिया २१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता सुरू होणार असून २७६ मतदान केंद्रांवरील सर्व मतांची मोजणी एकाच ठिकाणी केली जाणार आहे. २९ प्रभागांसाठी एकूण २९ टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक टेबलवर एक पर्यवेक्षक, दोन सहाय्यक आणि एक शिपाई नियुक्त असणार आहे. यासोबतच ईव्हीएम हाताळणीसाठी स्वतंत्र पथके आणि पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र देऊन अधिकृतरीत्या विजयी घोषित करण्यात येणार आहे.

ठळक वैशिष्ट्ये
- नगराध्यक्षपदासाठी एकूण आठ उमेदवार रिंगणात
- २९ पॅनेलमधून ५९ जागांसाठी २५९ उमेदवार
- एकूण मतदार दोन लाख ५४ हजार ४७८
- पुरुष- १,३५,१६४, महिला - १,१९,२९२, इतर २२ मतदार
- एकूण मतदान केंद्रे - २७६
- मतदानाची वेळ - २० डिसेंबर सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३०

एका मतदाराला किती वेळ?
प्रत्येक मतदार केंद्रामध्ये सुमारे ९०० ते ९५० मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. त्यानुसार एका मतदाराला मतदानासाठी किमान एक मिनिटांचा कालावधी मिळणार आहे. या कालावधीमध्ये नगराध्यक्षपदासह दोन नगरसेवकपदांसाठी दोन उमेदवार निवडून मतदान करायचे आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.