IND vs SA : सूर्यासेनेची मालिका विजयाची घोडदौड सुरुच, दक्षिण आफ्रिकेचा अंतिम सामन्यात 30 धावांनी धुव्वा
GH News December 20, 2025 03:11 AM

टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात अहमदाबादमधील पाचव्या आणि अंतिम टी 20I सामन्यात पाहुण्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 30 धावांनी विजय मिळवला आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेसमोर 232 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र दक्षिण आफ्रिकेला भारतीय गोलंदाजांसमोर 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 201 धावाच करता आल्या. भारताने यासह हा सामना आणि मालिका जिंकली. भारताचा हा मालिकेतील तिसरा विजय ठरला. भारताने यासह सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात 5 सामन्यांची मालिका 3-1 अशा फरकाने जिंकली. तिलक वर्मा, हार्दिक पंड्या आणि वरुण चक्रवर्ती हे तिघे भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले.

तिलक वर्मा आणि हार्दिक पंडया या दोघांनी चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. या दोघांनी वैयक्तिक अर्धशतकं करत भारताला 231 धावांपर्यंत पोहचवण्यात प्रमुख भूमिका बजावली. तर अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन या सलामी जोडीनेही योगदान दिलं. त्यानंतर वरुण चक्रवर्ती याने फिरकीने कमाल केली. वरुणने टीम इंडियासाठी सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. वरुणने दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना झटपट आऊट करत विजयी धावांपर्यंत पोहचण्यापासून यशस्वीरित्या रोखलं.

दक्षिण आफ्रिकेचा पराभव, भारताने मालिका जिंकली

क्विंटन डी कॉक आणि रीझा हेंड्रीक्स या सलामी जोडीने स्फोटक सुरुवात केली. या दोघांनी 69 धावांची भागीदारी केली. त्यानंतर वरुन चक्रवर्ती याने ही सेट जोडी फोडत भारताला पहिली विकेट मिळवून दिली. वरुनने रिझाला आऊट केलं.

त्यानंतर डी कॉक आणि डेवाल्ड ब्रेव्हीस या दोघांनी दुसऱ्य विकेटसाठी 23 बॉलमध्ये 51 धावांची भागीदारी करत दक्षिण आफ्रिकेला 100 पार पोहचवलं. जसप्रीत बुमराह याने सेट क्विंटन डी कॉक याला आऊट केलं. जसप्रीतने डी कॉक याला 65 धावांवर आऊट केलं. डी कॉकने दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वाधिक धावा केल्या. डी कॉक याने विजयाच्या हिशोबाने दक्षिण आफ्रिकेला सुरुवात दिली. मात्र डी कॉक आऊट झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेची घसरगुंडी झाली.

टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला झटपट झटके दिले. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेची 120 आऊट 1 वरुन 7 आऊट 163 अशी स्थिती झाली. क्विंटननंतर दक्षिण आफ्रिकेच्या एकाही फलंदाजाला भारतीय गोलंदाजांचा सामना करता आला नाही. तसेच क्विंटन आणि डेवाव्ड ब्रेव्हीस या दोघांव्यतिरिक्त एकालाही 20 पार मजल मारता आली नाही. दक्षिण आफ्रिकेने भारतीय गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. दक्षिण आफ्रिकेला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 201 धावांपर्यंतच पोहचता आलं. भारतासाठी वरुण चक्रवर्ती याने सर्वाधिक 4 विकेट्स मिळवल्या. जसप्रीत बुमराह याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर अर्शदीप सिंह आणि हार्दिक पंड्या या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.