'धुरंधर' आणि 'अवतार'मध्ये गाजतोय मराठमोळा 'उत्तर' चित्रपट; दिग्दर्शक म्हणतो- कोणतंही व्हिक्टीम कार्ड न खेळता...
esakal December 20, 2025 08:45 PM

गेल्या दोन आठवड्यात बॉक्स ऑफिसवर दोन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले. पहिला म्हणजे बॉलिवूडचा बहुचर्चित ठरलेला 'धुरंधर' आणि दुसरा म्हणजे हॉलीवूडचा बहुप्रतीक्षित 'अवतार'. या चित्रपटांना प्रेक्षकांनी गर्दी केलीये. 'धुरंधर'ने बॉक्स ऑफिस हादरवलंय. तर 'अवतार'चा देखील बोलबाला आहे. मात्र या दोन्ही चित्रपटांच्या वादळात एक मराठी सिनेमा बॉक्स ऑफिसवर तग धरून आहे तो म्हणजे रेणुका शहाणे, अभिनय बेर्डे आणि हृता दुर्गुळे यांचा 'उत्तर' चित्रपट. मराठी प्रेक्षकांचा एक कौटुंबिक चित्रपट म्हणून या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळालाय. त्यामुळे आता चित्रपटाच्या दिग्दर्शकाने पोस्ट करत याबद्दल आनंद व्यक्त केलाय.

'उत्तर' सिनेमाचा दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन याने एक पोस्ट करत लिहिलं, 'यापुढे मराठी मार खाणार नाही! चार पाच वर्षातून एकदा येणारा बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर' आणि चार पाच वर्षातून एकदा येणार ग्लोबल फेनॉमेना 'अवतार' यांच्या सोबत माझा पहिला सिनेमा 'उत्तर' प्रदर्शित झाला. 'धुरंधर' ने रणवीर च्या कॉंट्रोव्हर्सी नंतर सगळा नॅरेटिव्ह अक्षय खन्नावर फिरवला आणि मुळातच पॉवरफुल असलेल्या या सिनेमाने अजून जोर पकडला. बावीस बावीस शोज होते. अशावेळी पहिला सिनेमा घेऊन आलेला दिग्दर्शक म्हणून मी सगळ्यात आधी ठरवलं कि व्हिक्टीम कार्ड खेळायचं नाही! शोज मिळत नाही अशी आजिबात तक्रार करायची नाही, मराठी विरुद्ध हिंदी असं काहीही नॅरेटिव्ह आणायचं नाही.'

त्याने पुढे लिहिलं, 'उलट जिथे शोज मिळतील ते कसे चालतील याकडे लक्ष द्यायचं. १२ ला सिनेमा रिलीज झाला ज्याला शहरांमधून उत्तम प्रतिसाद मिळाला, पण तेव्हाच वाटलं की सिनेमा १९ ला रिलीज होतोय असं ट्रीट करूया आणि आणखी लोकांपर्यंत पोचवुया. मग कोल्हापूर, पुणे, आज मुंबई, वेगवेगळी कॉलेजेस, स्पर्धा, समारंभ इथे उपस्थिती लावली, सिनेमाबद्दल सांगितलं आणि त्याबद्दलची जागरूकता वाढवली. परीक्षणं अप्रतिम आली, वीकडेज ला सुद्धा शहरी सेंटर्स मध्ये चांगली ऑक्युपन्सी होती. एशियन फेस्टिव्हल ला सिलेक्शन झालं. बुक माय शो वर अप्रतिम रेटिंग आलं. दोन तुफानी सिनेमांसोबतच्या संघर्षाला सकारात्मक पद्धतीने तोंड दिलं आणि पुढेही देऊ. यात मराठी माध्यमं खूप उत्तम सपोर्ट करतायत. आमच्या कल्पनांची दखल घेतायत.'

तो पुढे म्हणतो, 'आज दुसरा विकेंड आहे आणि ६ ठिकाणी शोज वाढले आहेत. अवतार चे रिव्ह्यूज मिक्स्ड आहेत आणि धुरंधर लहान मुलांसोबत बघता येत नाही. अशा वेळी 'मराठी फॅमिली फिल्म' म्हणून 'उत्तर' चं पोझिशनिंग केलं, ज्याला वाढता प्रतिसाद मिळताना दिसतोय! अशी वेळ या आधी आणि या पुढे अनेक मराठी सिनेमावंर येणार आहे, तेव्हा स्वतःच्या कन्टेन्ट वर विश्वास ठेवून, व्हिक्टीम कार्ड न खेळता, हुशारीने, आणि एक एक दिवस लढूनच सिनेमा पोचवावा लागणार आहे. एवढचं वाटलं कि या सगळ्यात एक मेसेज जाणं गरजेचं होतं कि कितीही मोठा हिंदी आणि इंग्लिश सिनेमा येऊ दे, मराठी सिनेमा मार खाणार नाही! द फाईट इज ऑन!!'

मीराच्या डोळ्यांचा रंग का बदलला? इतके दिवस कुठे होती? 'तुला जपणार आहे'च्या अभिनेत्री सांगितलं खरं कारण, म्हणते- सेटवर मला...
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.