>> लक्ष्मण वालदे
निसर्ग आणि दुःखाचा गंध देणारा कवितासंग्रह म्हणजे `मर्मगंध’ होय. कविवर्य अय्युब पठाण लोहगावकर यांच्या `मर्मगंध’ या कवितासंग्रहातल्या सगळ्याच कविता अप्रतिम आहेत, पण मला `दान दे’, `मर्मगंध’ आणि `वनवाशी’ या कविता अप्रतिमहून अप्रतिम वाटल्या. या कवितांतील शब्द नि शब्द मनाला स्पर्श करणाऱया वाटल्या. या तीन कवितेत कवीने आपल्या शब्दांची जादू भन्नाट फिरवली आहे. निसर्गदेवताविषयी आस्था… आपल्या आस्थेतून केलेली प्रार्थना अतिउत्तम आहे. `मर्मगंध’ या कवितेतून स्वतच्या जगण्याचं प्रतिबिंब अप्रतिम रेखाटलं आहे. मनात जगण्याविषयी कुळकुळणाऱया भावना कवी व्यक्त करत शेवटी इच्छा कवीमन हळव्या मनाने व्यक्त करते. `मर्मगंध’ या कवितेतून कवी व्यक्त होतो आहे. `वनवासी’ या कवितेत कवीचे जन्मदाते त्याच्या लहानपणी त्याला सोडून गेले आणि इतरांची माय-बाप आता कवीला आपलेसे वाटायला लागले ही भावना, ही कल्पना वाचताना डोळे भरून येतात. कवितेतल्या व्यथेतला जिवंतपणा कसा मांडावा हे कविवर्य अय्युब पठाण लोहगावकर यांच्या लेखणीतून शिकायला मिळते. कवी `दान दे’ या कवितेत म्हणतो, निसर्गदेवतेसाठी आपल्या शब्दातून व्यक्त होत या सृष्टीला प्रार्थना करतो की,
नांदत्या हिरव्या रानात
पिकांना तू जीवदान दे
माणिक मोती पिकण्यास
अरे नभा, दान भुईला…!
`मर्मगंध’ या कवितेतून कवी जगण्याला छळणाऱया लोकांबद्दल खंत व्यक्त करत म्हणतो की, मी जेव्हा मरून जाईन
तेव्हा मजला जाळू नका,
जन्मभर जळतच होतो
आता चटके देऊ नका…!
माझा अंत झाल्यावरती
तेव्हा कोणीही रडू नका,
जन्मभर खूप रडलो मी
तुमचे रडणे ऐकवू नका…!
कवीच्या कोमल हृदयावर झालेला आघात मोठा आहे. हा आघातात बसलेला चटका आणि चटक्यातून भाजलेलं आयुष्य त्यांनी कागदावर कोरले. विना माय-बापचं आयुष्य कोरताना सोसलेले घाव आणि त्या घावातून घडलेला माणूस कवीने लेखनातून उत्तमरीत्या रेखाटला आहे. `मर्मगंध’ हा सगळा कवितासंग्रह वाचल्यानंतर असे लक्षात येते की, कवीची लेखणी ही सरळ आणि प्रामाणिक आहे. अर्थात निसर्ग आणि दुःखाच्या गंधातून `मर्मगंध’ कवितासंग्रहाची निर्मिती झालेली असून अतिशय दर्जेदार आणि वाचकांच्या हृदयाचा ठाव घेणाऱया कविता या संग्रहात आहेत.
वास
कवी ः अय्युब पठाण लोहगावकरे
प्रकाशन ः साहित्य लिला प्रकाशन, पुणे.
पृष्ठे ः 68 ह मूल्य ः 100 रुपये