नागपूर : प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, विदर्भात अपेक्षेप्रमाणे शुक्रवारी थंडीची तीव्र लाट अनुभवायला मिळाली. हवेत गारठा वाढल्याने नागपूरच्या तापमानात दीड अंशांची घट होऊन पारा ८.५ अंशांवर आला. तर गोंदिया येथे पुन्हा ८.० अंश सेल्सिअस इतकी नीचांकी तापमानाची नोंद झाली.
हवामान विभागाचा अंदाज व एकूणच कोरडे वातावरण लक्षात घेता, वैदर्भीयांना सध्यातरी थंडीपासून दिलासा मिळण्याची शक्यता कमीच आहे. उत्तर भारतातील डोंगराळ भागांमध्ये सुरू असलेल्या जोरदार बर्फवृष्टीचा प्रभाव विदर्भात सगळीकडेच तीव्रतेने दिसत आहे.
राजस्थानातून वाहणाऱ्या गारठायुक्त वाऱ्यांमुळे रात्रीचा पारा दिवसेंदिवस खाली घसरत आहे. थंडीच्या कडाक्यामुळे गेल्या चोवीस तासांत नागपूरच्या किमान तापमानात १.५ अंशांची घट होऊन पारा ८.५ वर स्थिरावला. उपराजधानीत शुक्रवारी नोंदविलेले तापमान यंदाच्या हिवाळ्यातील चौथे नीचांकी तापमान ठरले.
१० डिसेंबर रोजी नागपूरचा पारा नीचांकी ८.० अंशांपर्यंत घसरला होता. थंडीच्या बाबतीत गोंदिया शहर पुन्हा ''कोल्ड डेस्टिनेशन'' ठरले आहे. येथे शुक्रवारीही विदर्भात सर्वात कमी ८.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. याशिवाय विदर्भातील अमरावती (९.८ अंश), भंडारा (१०.० अंश), यवतमाळ (१०.२ अंश), अकोला (१०.४ अंश), गडचिरोली (१०.६ अंश), वाशीम (१०.८ अंश), वर्धा (१०.८ अंश) या प्रमुख शहरांमध्येही शितलहरीचा जोरदार कहर दिसून आला.
Nagpur Cold : थंडीने गारठली उपराजधानी, पारा नीचांकावर; तापमान ८.५ अंशांवर घसरले; हंगामातील सर्वात थंड दिवस नागपूरचा थंडीचा विक्रम मोडीत निघणार काय?डिसेंबर महिन्याचा आतापर्यंतचा इतिहास बघितल्यास, नागपूरच्या नीचांकी तापमानाचे विक्रम अनेकवेळा मोडीत निघाले आहे. सार्वकालिक नीचांकी तापमानाचा विक्रम ३.५ अंश सेल्सिअस आहे, जो सात वर्षांपूर्वी २९ डिसेंबर २०१८ मध्ये नोंदला गेला होता. यावर्षी डिसेंबर मधील एकूणच वातावरण आणि एका पाठोपाठ येत असलेल्या जोरदार शितलहरी लक्षात घेता, नागपूरचा थंडीचा विक्रम मोडीत निघणार काय? अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.