उरुळी कांचन, ता.१८ : उरुळी कांचन (ता. हवेली) परिसरातील विक्रेते युरिया खताची पिशवी मागितली की, अन्य खतांच्या पिशव्या घेण्याची बळजबरी करून शेतकऱ्यांची पिळवणूक करीत आहेत. युरियाच्या पिशव्या गोदामात शिल्लक असतानाही शेतकऱ्यांनी विक्रेता सुरुवातीला युरिया शिल्लक नाही असेच उत्तर देतो. मात्र, नंतर शेतकऱ्याला आपण २०:२०:०० घ्या मग युरिया देतो किंवा १५:१५:१५ घ्या मग युरिया देतो. १५:१५ खताची पिशवी घेतली तर लिक्विड युरिया देतो अशा पद्धतीची बतावणी केली जाते जात आहे. यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.
खत विक्रेत्यांवर नियंत्रण असणाऱ्या कृषी खात्याअंतर्गतच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचे या बाबीकडे का दुर्लक्ष आहे? का काही अर्थपूर्ण तडजोडीतून शेतकरी भरडला जातोय? अशी शंका सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मनात गोंधळ घालत आहे.
शेतकऱ्यांना लिंकिंग खताची बळजबरी करून त्यांची अडवणूक केली जात आहे अशी तक्रार उरुळी कांचन येथील शेतकरी विनोद जयसिंग कांचन यांनी केली आहे. १८:४६ व १०:२६:२६ या खतांच्या पिशव्या पांढऱ्या दाण्यांच्या स्वरूपात शेतकऱ्याला अपेक्षित असतात. मात्र, खत विक्रेते शेतकऱ्यांना काळ्यादाण्यांचे पिशव्या घेण्याचा आग्रह करतात. काळ्या दाण्यांचे खत हे पाण्यामध्ये विरघळत नसल्यामुळे ते खत टाकून शेतकऱ्याला त्याचा काहीही उपयोग होत नाही, अशी तक्रार बोरी ऐंदी येथील शेतकरी तथा दौंड तालुका खरेदी विक्री संघाचे माजी सभापती मुरलीधर भोसेकर यांनी केली आहे.
खतांच्या लिंकिंगबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी असतील त्यांनी कार्यालयाशी संपर्क साधावा. त्या तक्रारींची दखल घेऊन खत विक्रेत्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल. तरीही बहुतांश शेतकऱ्यांची मागणी आहे की, खतविक्रेत्यांवर शासकीय अधिकाऱ्यांची शेतकरी पूरक दहशत असावी. जेणेकरून गरजेचे वेळी आवश्यक तो खताचा साठा विनासायास शेतकऱ्यांना उपलब्ध होईल.
- अशोक वेताळ, गुण नियंत्रण अधिकारी, ता. हवेली
युरिया खताची पिशवीची २६८ रुपये विक्री किंमत असताना हे खत विक्रेते तीनशे रुपये घेऊन देखील वेळेवर युरिया खताची पिशवी देत नाहीत. शिवाय युरियाची मागणी केली की, युरिया शिल्लक नाही असे सांगतात.
- भीमराव शितोळे, शिंदवणे