जुन्या पुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
ठुणे येथील दगडी पूल कोसळला; १४ गावांचा संपर्क तुटला
मुरबाड, ता. २० (वार्ताहर) : तालुक्यातील नांदगाव–पाडाळे रस्त्यावर बांदलपाडा–ठुणेदरम्यान डोईफोडी नदीवरील जुना, मोडकळीस आलेला दगडी पूल शुक्रवारी पहाटे सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळल्याने परिसरातील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. या घटनेमुळे ठुणे, पाडाळे, कोळोशीसह तब्बल १४ गावांचा संपर्क तुटला असून, नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
हा पूल अनेक वर्षांपासून अत्यंत जीर्ण अवस्थेत होता. या पुलाच्या जागी नवीन पूल बांधावा, अशी मागणी ठुणे व पाडाळे परिसरातील नागरिकांकडून सातत्याने केली जात होती. मात्र प्रशासनाच्या ढिम्म भूमिकेमुळे व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे ही मागणी दुर्लक्षित राहिली. अखेर गुरुवारी पहाटे हा पूल मध्य भागातून दबून दोन तुकड्यांत विभागला गेला. सुदैवाने ही घटना पहाटे घडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या पुलावरून शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला, आजारी रुग्ण तसेच कामगारवर्गाची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. पूल कोसळल्याने पर्यायी मार्ग नसल्यामुळे नागरिकांची मोठी कोंडी झाली असून, दैनंदिन जीवन विस्कळित झाले आहे. प्रशासनाच्या निष्काळजीमुळेच ही वेळ आल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. या घटनेच्या निमित्ताने तालुक्यातील हेदवली, चासोळे, न्याहाडी आदी ठिकाणच्या जुन्या पुलांचाही प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. भविष्यात मोठा अपघात टाळण्यासाठी सर्व जुन्या पुलांचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
...................
लवकरच बांधकामाला सुरुवात
दरम्यान, ग्रामस्थ ज्ञानेश्वर मुरबाडे यांनी सांगितले, की गेल्या चार वर्षांपासून आम्ही नवीन पुलासाठी पाठपुरावा करीत होतो; मात्र प्रशासनाने दखल घेतली नाही. माजी सभापती स्वरा सचिन चौधरी यांनी स्पष्ट केले, की आराखड्यात पूल मंजूर असून निधीअभावी काम रखडले होते. आमदार किसन कथोरे यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच नवीन पुलाचे काम सुरू होईल. माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष घरत यांनीही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.