पुरे झालं, आता सेक्युलर गाणं गा..; गायिकेनं भक्तीगीत गाताच स्टेजवर येऊन केला राडा
Tv9 Marathi December 21, 2025 09:45 PM

कोलकातामधली गायिका लग्नजीता चक्रवर्तीचा छळ केल्याप्रकरणी पूर्वा मेदिनीपूर पोलिसांनी रविवारी शाळेच्या मालकाला अटक केली. आरोपीचं नाव मेहबूब मलिक असं आहे. भक्तीगीतं गायल्यामुळे त्रास दिल्याचा आरोप लग्नजीताने केला. त्याऐवजी धर्मनिरपेक्ष गाणं गाण्यासाठी तिचा छळ करण्यात आला. याप्रकरणी तिने शनिवारी पूर्व मेदिनीपूरमधल्या भगवानपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

नेमकं काय घडलं?

“कार्यक्रम संध्याकाळी 7 वाजता सुरू झाला होता. सात ते पावणे आठ वाजेपर्यंत कार्यक्रम सुरळीत सुरू होता. पहिल्या तीन गाण्यांनंतर माझं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर संध्याकाळी 7.45 वाजता मी माझ्या गाण्यांच्या यादीतील सातवं गाणं गायला सुरुवात केली. आठव्या गाण्याकडे जाण्यापूर्वी मी प्रेक्षकांशी संवाद साधत होते. तेव्हाच ही घटना घडली”, असं गायिकेनं सांगितलं. लग्नजीताने देवी चौधराणी यांचं ‘जागो माँ’ हे गाणं गायलं. त्याच्या काही क्षणांनंतर मलिक स्टेजवर आले आणि त्यांनी तिच्यावर हात उचलण्याचा प्रयत्न केला. तितक्यात मंचावरील उपस्थितांनी त्यांना पकडलं आणि स्टेजवरून खाली नेलं. स्टेजवरून खाली जात असतानाही मलिक अपमानास्पद भाषा वापरत होते, अशी तक्रार लग्नजीताने केली.

याविषयी तिने पुढे सांगितलं, “जेव्हा मी ‘जॉय माँ’ हे गाणं गायला सुरू केलं, तेव्हा मलिक म्हणाले, पुरे झालं.. आता तू काहीतरी धर्मनिरपेक्ष गाणं गा. खरंतर केवळ शाब्दिक गैरवर्तनच नाही तर शोदरम्यान मला शारीरिक छळाचाही सामना करावा लागला. या घटनेनंतर मी तो कार्यक्रम सोडून तिथून निघून गेली आणि थेट तक्रार दाखल करण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यात गेली.”

लग्नजीता चक्रवर्ती एका शाळेत परफॉर्म करत असताना ही घटना घडली. आम्ही तिला सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आहे. यासोबतच, या घटनेत पोलिसांकडून काही निष्काळजीपणा झाला आहे का, याचीही आम्ही चौकशी करत आहोत, अशी माहिती पूर्वा मेहिनीपूरचे पोलीस अधीक्षक मितुन कुमार डे यांनी दिली.

आरोपी मलिक हे सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे सदस्य असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने (भाजप) केला. याविषयी भाजपचे शंकूदेव पांडा म्हणाले, “पश्चिम बंगाल जिहादींच्या ताब्यात आहे. ते आता गायकांना कोणती गाणी गावीत हे सुद्धा सांगू लागले आहेत. ही एक हिंदूविरोधी युक्ती होती. जेव्हा लग्नजीता पोलीस ठाण्यात गेल्या तेव्हा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सत्तेतील पोलिसांनी तक्रार नोंदवण्यास नकार दिला.” याप्रकरणी अद्याप तृणमूल काँग्रेसकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नाही.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.