टीम इंडियाने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेवर मात करत नोव्हेंबर महिन्यात वनडे वर्ल्ड चॅम्पियन होण्याची कामगिरी केली. टीम इंडियाने भारतात झालेल्या या वर्ल्ड कप स्पर्धेत इतिहास घडवला. भारताची ही वर्ल्ड कप जिंकण्याची पहिलीच वेळ ठरली. वर्ल्ड कप विजयानंतर टीम इंडिया विश्रांतीवर होती. अनेक आठवड्यांच्या विश्रांतीनंतर आता टीम इंडियाची महिला ब्रिगेड एक्शन मोडवर आली आहे. टीम इंडिया मायदेशात श्रीलंकेविरुद्ध 5 सामन्यांची टी 20i मालिका खेळणार आहे. मालिकेतील सलामीच्या सामन्याचं आयोजन हे आज 21 डिसेंबरला विशाखापट्टणमधील एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. भारताच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार हरमनप्रीतने फिल्डिंगचा निर्णय घेत श्रीलंकेला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.
वर्ल्ड कप विजयानंतर टीम इंडियाची उपकर्णधार स्मृती मंधाना हीचा सांगलीत पलाश मुच्छलसोबत विवाह पार पडणार होता. मात्र स्मृतीवर एकामागोमाग एक संकटं आली. लग्नाच्या दिवशी स्मृतीचे वडील श्रीनिवास यांची प्रकृती बिघडली. त्यानंतर पलाशचीही तब्येत बिघडली. त्यामुळे लग्न पुढे ढकलण्यात आलं.
त्यामुळे स्मृती आणि पलाशचं लग्न केव्हा होणार? याची चाहत्यांना प्रतिक्षा होती. मात्र या दरम्यान अनेक उलटसुलट चर्चा रंगल्या. पलाश स्मृतीला फसवत असल्याची चर्चा रंगली. त्यामुळे स्मृती-पलाश याचं लग्न मोडणार असल्याची चर्चा पाहायला मिळाली. अखेर ही भीती खरी ठरली. स्मृतीने पलाशसोबतचं लग्न मोडल्याचं जाहीर केलं. स्मृतीवर वर्ल्ड कप विजयानंतर अनेक संकट आली. मात्र स्मृतीने या सर्व संकटावर खंबीरपणे मात केली. स्मृती आता वैयक्तिक आयुष्यातील सर्व संकट विसरुन पुन्हा एकदा जोरात सुरुवात करण्यासाठी सज्ज झाली आहे. स्मृती या सामन्यात कशी कामगिरी करते? याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
वूमन्स टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, अमनजोत कौर, अरुंधती रेड्डी, वैष्णवी शर्मा, क्रांती गौड आणि श्री चरणी.
श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : विश्मी गुणरत्ने, चमारी अथापथु (कॅप्टन), हसिनी परेरा, हर्षिता समरविक्रमा, निलाक्षी डी सिल्वा, कौशली नुथ्यांगना(विकेटकीपर), कविशा दिलहारी, मलकी मदारा, इनोका रणवीरा, काव्या कविंदी आणि शशिनी गिम्हनी.