आयसीसी वनडे वर्ल्ड कप चॅम्पियन वूमन्स टीम इंडियाने विशाखापट्टणममध्ये श्रीलंकेविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी 20i मालिकेत विजयी सलामी दिली आहे. टीम इंडियाने पहिल्या टी 20i सामन्यात एकतर्फी आणि धमाकेदार असा विजय मिळवला आहे. श्रीलंकेने टीम इंडियासमोर 122 धावांचं आव्हान ठेवलं होतं. टीम इंडियाने हे आव्हान 14.2 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून पूर्ण केलं. भारताच्या या विजयात जेमीमाह रॉड्रिग्स हीने बॅटिंगने प्रमुख योगदान दिलं. तर उपकर्णधार स्मृती मंधाना आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनीही योगदान दिलं. टीम इंडियाने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.
महिला ब्रिगेडची विजयी धावांचा पाठलाग करताना काही खास सुरुवात राहिली नाही. शफाली वर्मा आणि स्मृती मंधाना ही सलामी जोडी भारताला चांगली सुरुवात देण्यात अपयशी ठरली. भारताने शफालीच्या रुपात पहिली विकेट गमावली. शफालीला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. शफाली 9 धावा करुन आऊट झाली.
त्यानंतर स्मृती आणि जेमीमाह रॉड्रिग्स या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. जेमी आणि स्मृती या दोघींनी 41 बॉलमध्ये 54 रन्सची पार्टनरशीप केली. मात्र स्मृती आऊट होताच ही जोडी फुटली. स्मृतीने 100 च्या स्ट्राईक रेटने 25 बॉलमध्ये 25 रन्स केल्या.
स्मृती आऊट झाल्यानंतर कॅप्टन हरमनप्रीत कौल मैदानात आली. जेमीमाह आणि हरमनप्रीत या जोडीने भारतासाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी करत विजयी केलं. या दोघींनी तिसऱ्या विकेटसाठी 39 बॉलमध्ये 55 रन्सची नॉट आऊट पार्टनरशीप केली. जेमीने 44 बॉलमध्ये 156.82 च्या स्ट्राईक रेटने नॉट आऊट 69 रन्स केल्या. जेमीने या खेळीत 10 चौकार लगावले. तर हरमनप्रीत कौरने नाबाद 15 धावा केल्या. श्रीलंकेकडून काव्या काविंदी आणि इनोका रणवीरा या दोघींनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
भारताचा एकतर्फी विजय
त्याआधी भारताने नाणेफेक जिंकून श्रीलंकेला फलंदाजीसाठी भाग पाडलं. श्रीलंकेचे फलंदाज भारतीय गोलंदांजांसमोर निष्प्रभ ठरले. श्रीलंकेला 6 विकेट्स गमावून 121 रन्सच करता आल्या. श्रीलंकेसाठी विष्मी गुणरत्ने हीने सर्वाधिक 39 धावा केल्या. हर्षिता मडावी हीने 21 तर हसिनी परेरा हीने 20 धावांचं योगदान दिलं. तर कॅप्टन चमारी अटापटू हीने 15 रन्स केल्या. त्या व्यतिरिक्त कुणालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. टीम इंडियाकडून क्रांती गौड, दीप्ती शर्मा आणि श्री चरणी या तिघींनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.